महाविकास आघाडी सरकार असताना बारामतीकरांनी काय-काय पळवलं? विजय शिवतारेंचा यादी वाचत उद्धव ठाकरेंवर निशाणा
महाविकास आघाडी सरकार असताना बारामतीकरांनी काय-काय पळवलं? विजय शिवतारेंचा यादी वाचत उद्धव ठाकरेंवर निशाणा
"पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी मी मंत्री असताना मंजूर करून आणलेली गुंजवणी पाणी योजना मविआ सरकार येताच अजित पवारांनी बारामतीला पळवून नेली आणि या पुरंदरचा गाढव आमदार तोंडातून एक शब्द काढत नाही", अशी खोचक टीका विजय शिवतारे यांनी केली.
पुणे, 2 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकार असताना पुरंदर तालुक्यातील अनेक विकास कामे पळवले. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीच बोलले नाहीत, अशी टीका शिवतारे यांनी केली. विशेष म्हणजे शिवतारे यांनी यावेळी अजित पवारांनी पुरंदरमधून बारामतीत काय काय पळवलं याची यादीच वाचून दाखवली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुण्यातील सासवड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत माजी मंत्री विजय शिवतारे यांनीदेखील भाषण केलं. यावेळी त्यांनी अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. या कार्यक्रमाला माजी मंत्री उदय सामंत, तानाजी सावंत, विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शहाजी पाटील उपस्थित होते.
"पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी मी मंत्री असताना मंजूर करून आणलेली गुंजवणी पाणी योजना मविआ सरकार येताच अजित पवारांनी बारामतीला पळवून नेली आणि या पुरंदरचा गाढव आमदार तोंडातून एक शब्द काढत नाही. राष्ट्रीय कृषी बाजारही पवारांनी तिकडे हवेलीला पळवला. तरीही मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे का गप्प बसले?", असा सवाल विजय शिवतारे यांनी केला.
(एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शिंदे सरकारचा सर्वात मोठा निर्णय, थेट 100 कोटींच्या निधीची मदत)
"पुरंदरचं विमानतळ ही बारामतीकरांनी पळवलं तरीही हे गप्पच. मी पवारांना भेटलो तरीही आमचे मुख्यमंत्री काहीच का बोलले नाहीत?", असा खडा सवाल विजय शिवतारेंनी उद्धव ठाकरेंना केला. "याच बारामतीकरांनी महाराष्ट्रातलं सात्विक राजकारण संपून बाजारू राजकारण आणलं", अशी देखील टीका यावेळी शिवतारे यांनी केली.
"बारामतीकरांनी महाराष्ट्रातलं सात्विक राजकारण संपवलं. वसंत दादा पाटलांचा धोका करुन खंजीप खुपसून यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, वसंत दादा पाटील यांचं सात्विक राजकारण संपवून बाजारु राजकारण आणलं", अशी टीका शिवतारे यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.