पुणे, 15 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही दिवसापूर्वी पुण्यातील चांदणी चौक येथे मोठ्या ट्रॅफिकचा सामना करावा लागला होता. या घटनेनंतर येथील सध्याचा असलेला पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. साक्षात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर पूल पाडण्याच्या कामाला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. बांधलेला पूल पाडण्याची ही अलिकडच्या काळातील दुसरी वेळ आहे. यापूर्वी पुणे विद्यापीठाच्या रोडवरील उड्डाण पूल देखील पाडण्यात आला होता. या दोन्ही घटनांमुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत.
पूल पाडणं गरजेचं आहे का?
चांदणी चौकातील पूल 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. हा पूल बांधला त्यावेळी देखील पुणे हे देशातील झपाट्यानं वाढणारे महानगर होते. या महानगराचे नियोजन करताना पुढील 50 किंवा 100 वर्षांचा विचार का झाला नाही? ‘या प्रकारच्या नियोजनशून्य कामामुळेच पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय होत आहे. चांदणी चौकातील वाहतुकीमध्ये मुख्यमंत्री अडकले आणि हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठ रोडवरील पुलावर अजित पवार आणि काही नगरसेवक अडकले आणि तो पूल पाडण्यात आला. या प्रकारच्या कामासाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक असते. याचा अभ्यास केला जात नाही. त्यामुळे जनतेचे पैसे पाण्यात जातात, अशी टीका आम आदमी पक्षाचे नेते मुकुंद किर्दक यांनी केली आहे.
हेही वाचा : धक्कादायक वास्तव! मुंबईत दीड लाख लोक बेघर, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांकडंही दुर्लक्ष
‘राष्ट्रवादीवर खापर’
भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या पुलाच्या अनियोजनाचे खापर पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांवर फोडले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीमध्ये हा पूल बांधला गेला होता. त्यांनी त्यांच्याकडून नियोजन न केल्यामुळे भाजपच्या काळामध्ये हा पूल पाडला जाणार आहे.’ असा दावा मुळीक यांनी केलाय.
शहरातल्या किंवा राज्यातील कोणत्याही मुद्यांप्रमाणे चांदणी चौकातील पुलावरही राजकारण सुरू झालंय. आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी आगामी काळामध्ये आणखी तीव्र होतील. दावे-प्रतिदावे केले जातील. या सर्वांमध्ये पुणेकरांना चांदणी चौकात पुढील काही वर्ष वाहतूक कोंडीतूनच प्रवास करावा लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm eknath shinde, Pune