पुणे, 02 जानेवारी: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार (Temperature ups and down) पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी सकाळी धुके, दुपारी ऊन आणि रात्री थंडी अशा प्रकारचं संमिश्र वातावरण अनुभुवायला मिळत आहे. यानंतर पुढील दोन दिवस राज्यात गारठा कायम राहणार आहे. पण त्यानंतर मात्र राज्यातील किमान तापमानात जवळपास 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातून थंडी पुन्हा गायब होण्याचा अंदाज आहे.
सध्या उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट ओसरली आहे. हरियाणा आणि पंजाब वगळता उत्तरेत सर्वत्र थंडीचा कडाका कमी झाला आहे. आज हरियाणातील हिस्सारमध्ये देशातील सपाट भूभागावरील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. याठिकाणी 2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पण येत्या चोवीस तासांत उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची लाट आणखी कमी होणार आहे. तसेच पश्चिमी चक्रावातामुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यांमध्ये हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.
2 Jan, 🔸पुढील 24hr,द.तामिळनाडू,मुसळधार पाऊस. नंतर कमी 🔸येत्या 5-7 दिवसांत NW भारतात कोल्ड वेव्ह स्थिती नाही (24hr पंजाब,हरियाणा वगळता) 🔸सलग 2WDs व संलग्न सिस्टिममुळे, येत्या 7 दिवसांत NW,लगतच्या मध्य भारतावर परिणाम 🔸महाराष्ट्रातील किमान तापमान २ दिवसांनंतर क्रमश: वाढणार -IMD pic.twitter.com/KDy5sMIFV3
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 2, 2022
याचबरोबर सध्या उत्तर भारतात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. येत्या पाच दिवसांत उत्तर, मध्य आणि वायव्य भारतात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जम्मू काश्मीर आणि लडाख परिसरात काही ठिकाणी हिमवर्षाव देखील होण्याचा अंदाज आहे. 4 जानेवारीनंतर उत्तर भारतात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा-लहान मुलांना विळख्यात घेतोय Corona? 98 विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह
दुसरीकडे, महाराष्ट्रात मात्र काल कोरडं हवामान होतं. तर आजही संपूर्ण राज्यात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला आहे. राज्यात काल विदर्भात बहुतांश भागात किमान तापमान 13 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदलं गेलं आहे. येत्या काही दिवसात राज्यातील सर्वच ठिकाणी किमान तापमान 2 अंशाने वाढण्याची शक्यता आहे. आज पुणे जिल्ह्यात माळीण याठिकाणी सर्वात कमी 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अन्य ठिकाणी किमान तापमान 14 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather forecast