पुणे, 03 ऑगस्ट : काय झाडी...काय डोंगार...काय हॉटेल एकदम ओक्के म्हणत शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी हॉटेलचा मनमुराद आनंद लुटला. पण, आता सत्ता स्थापन झाल्यानंतरही शिंदे गटातील आमदारांचं हॉटेल प्रेम काही गेले सुटायचं नाव घेत नाही. शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाला. पण, उदय सामंत हे मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा सोडून हॉटेलमध्ये जेवायला निघाले होते, अशी माहिती आता समोर आली आहे.
शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये तीव्र संताप आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या प्रकरणी शिवसेनेच्या शहरप्रमुखांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाची गमंतशीर बाजू समोर आली आहे.
त्याचं झालं असं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उदय सामंत हे सोबत होते. उदय सामंत हे मोहमद वाडी येथील कार्यक्रम आटोपून पुढे मुख्यमंत्र्यांचा ताफा सोडून पुढे निघाले होते.
(नाशिक मासिक पाळी प्रकरण पीडित मुलगी करणार राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार)
उदय सामंत हे ठरवून दिलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कॅानव्हॅायचा मार्ग सोडून निसर्ग हॅाटेलला जेवण्यासाठी निघाले होते. निसर्ग हॉटेल हे पुण्यात प्रसिद्ध असे हॉटेल आहे. त्यामुळे इथं खवय्यांची नेहमी गर्दी असते. त्यामुळे उदय सामंत यांनी निसर्ग हॉटेलचा बेत आखला होता. आता निसर्ग हॉटेल जायचं कसं म्हणून उदय सामंत यांच्या ताफ्याने गुगल मॅपवरून जाण्याचा निर्णय घेतला. मग काय गुगलवरून जसा मार्ग दिसत होता, त्यानुसार, ताफा पुढे जात होता. गूगल मॅप हून निसर्ग हॉटेलाला जाण्यासाठी रस्ता निवडला त्यामुळे ते आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी पोहोचले, अशी माहिती अतिवरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिला आहे.
तसंच, उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना जिथे घडली तो ताफ्याचा रस्ता नव्हता, घटना वेगळ्या ठिकाणी घडली, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे , वरिष्ठ पोलीस निरीक्ष जगन्नाथ कळसकर यांनी दिली.
(रेल्वे कर्मचारी स्वत:च्या कारने ड्युटीवर आल्याने वरिष्ठांकडून नोटीस)
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक हजर होते. त्यामुळे उदय सामंत यांचा ताफा पाहिल्यामुळे शिवसैनिकांच्या संतापाचा कडेलोड झाला. शिवसैनिकांनी उदय सामंत यांना गाडीत बघितलं त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत हल्ला केला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. पण, पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. उदय सामंत यांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या तीन गाड्या होत्या. तसंच स्थानिक पोलिसांच्या पायलट व्हॅनही सामंत यांच्या ताफ्यात होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.