Home /News /maharashtra /

भाजपने काँग्रेसवाल्यांना हाफ चड्डी घातली : संजय राऊत

भाजपने काँग्रेसवाल्यांना हाफ चड्डी घातली : संजय राऊत

महाराष्ट्रात शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजप मोठा झाला का? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं.

    पुणे, 4 जून : पुण्यात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांच्या संयुक्त मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संजय राऊत आणि शरद पवारांनी विविध राजकीय घडामोडींवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. संजय राऊत यांनी या कार्यक्रमात एका महत्त्वाच्या प्रश्नावर उत्तर दिलं. महाराष्ट्रात शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजप (BJP) मोठा झाला का? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं. "तुमच्या प्रश्नाशी मी सहमत नाही. महाराष्ट्रात शिवसेनेच्या मदतीने भाजप पक्ष वाढला हे नक्कीच खरं आहे. पण तुम्ही एक लक्षात घेतलं का, भाजपची आज जी ताकद दिसतेय, विधानसभा किंवा लोकसभा असेल, त्यातील 75 टक्के लोकं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेले आहेत. त्यांनी काँग्रेसवाल्यांना हाफ चड्डी घातली आहे. हा मुळ विचार नाहीय. त्यामुळे तो विचार किंवा ते विष महाराष्ट्रात वाढतंय, असं नाहीय. त्यांनी काही लोकांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी सामील करुन घेतलं. 2024 च्या आधी त्यांचं अर्ध दुकान खाली होणार आहे. हाफ चड्डी घालणारे फुल पँट शिवायला टाकणार आहेत", असं मिश्किल उत्तर संजय राऊतांनी दिलं. (रोहित पवार नामदार होणार का? शरद पवारांच्या उत्तराने कार्यकर्ते अवाक्) "आपण म्हणता की, संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे. पण विषय समजून घेतला पाहिजे. नागपूर हा काँग्रेसचाच बालेकिल्ला राहिलेला आहे. नागपूरला वर्षोनुवर्षे काँग्रेसचाच माणूस पार्लिमेंटला निवडून जात होता. आता एखाद दुसरं वर्ष अपवाद आहे. त्यामुळे त्यांचा फार प्रभाव नव्हता. वर्धा, भंडारा, चिमूर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे आमदार निवडून आले. नंतर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. भाजपचे उमेदवार अलिकडच्या काळात निवडून यायला लागले. त्यामुळे नागपूर मुख्यालय असल्याने काही पडला नाही", असं संजय राऊत म्हणाले. 'मी रात्री बारा वाजता अमित शाहांना फोन केला, सांगितलं अटक करा' ईडी-आयटीच्या धाडी फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांवर का पडतात, भाजपवर का पडत नाही? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. त्यावर संजय राऊतांनी 2024 नंतर त्याचं उत्तर देऊ. आमचेही दिवस येतील. लोकशाही आहे. समोर लोक बसले आहेत. 2024 मध्ये त्याचं उत्तर मिळेल, असं उत्तर संजय राऊतांनी दिलं. त्यापुढे राऊतांना ईडीच्या धाडीचा त्रास होतो का? असा प्रश्न विचारला. त्यावर संजय राऊतांनी महत्त्वाचं विधान केलं. "त्रास म्हटला तर होतो. पण आपण त्रास करुन घ्यायचा नाही. जे होणारच आहे, आपल्यामागे ससेमिरा लावणारच आहे. एकदा कळल्यावर त्रास कशाकरता करुन घ्यायचा? आता माझ्यासारख्या माणसाची नसलेली प्रॉपर्टी जप्त केली. मी ज्या घरात राहतो ते घर, आणि माझी वडिलोपार्जित 40-45 गुंठे जमीन आहे. कोणतीही नोटीस न देता जप्त केली. आणि रोज अटक करा, असं चाललं आहे. मी निरोप दिला,अरे मी बसलोय, कधी अटक करणार? ज्यादिवशी माझ्या जवळच्या लोकांवर धाडी पडल्या, त्यादिवशी मी रात्री बारा वाजता दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना फोन केला होता. मी त्यांना सांगितलं, मी दिल्लीमध्ये बसलेलो आहे. माझ्यासाठी गरिबांना का त्रास देत आहात? मी बसलेलो आहे. मला अटक करा. आम्ही घाबरत नाहीत. पुष्पा चित्रपटातला डायलॉग आहे ना. झुकेंगा नहीं.", असं संजय राऊत रोखठोकपणे म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या