पुणे, 15 सप्टेंबर : वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असताना शरद पवार यांनी याबाबत भूमिका मांडली आहे. हा प्रकल्प तळेगावला येणार होता, राज्य सरकारनेही तयारी केली होती, पण आता काही उपयोग नाही. आता चर्चा करण्यात अर्थ नाही, असं पवार म्हणाले आहेत.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावरही शरद पवारांनी निशाणा साधला आहे. उद्योगमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं, ते म्हणाले गेल्या वेळच्या सरकारची जबाबदारी आहे, पण गंमत आहे हे तिथेपण मंत्री होते, असा टोला पवारांनी लगावला. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. यानंतर पंतप्रधानांकडून महाराष्ट्राला आणखी मोठा प्रोजेक्ट देण्याचं आश्वासन मिळाल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं, यावरही पवारांनी टोला हाणला. लहान मुलाची समजूत काढावी, तसं पंतप्रधान बोलले आहेत, असं वक्तव्य पवारांनी केलं.
'गुजरातला काही गेलं तर तक्रार करायची गरज नाही. आता ते दोघं गुजरातचे आहेत. घराकडे ओढ असणं साहजिक आहे. आता जे गेलं ते गेलं, नवीन काय आणता येईल ते बघायला हवं,' असं विधान शरद पवार यांनी केलं.
'भरपूर जेवण झाल्यावर माणूस थंड होतो, तसं महाराष्ट्राचं झालंय, त्यामुळे नेतृत्वाने प्रयत्न करण्याची गरज आहे. योग्य वातावरण निर्माण करायला हवं. रोज काय झाड डोंगर दाखवता, आता राज्याचा विचार होण्याची गरज आहे. राज्य सरकार इतर बाबतीत फार गतिमान आहे,' अशी बोचरी टीकाही शरद पवारांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.