Home /News /maharashtra /

साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यात यंदा दुसऱ्या क्रमांकाचं विक्रमी ऊस गाळप, गेल्या वर्षी झाली होती ईडीची कारवाई

साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यात यंदा दुसऱ्या क्रमांकाचं विक्रमी ऊस गाळप, गेल्या वर्षी झाली होती ईडीची कारवाई

राज्यातील ऊस गाळप हंगामात यंदा पहिल्या क्रमांकाचं गाळप माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, तर दुसऱ्या क्रमांकाचं गाळप जरंडेश्वर साखर कारखान्यानं केलं आहे.

मुंबई, 27 जून: गेल्या वर्षी जरंडेश्वर साखर कारखान्यावर (Jarandeshwar Sugar Mill) ईडीकडून झालेली जप्तीची कारवाई आणि यंदा तीन कारखाने बंद असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट होतं. मात्र यंदा जरंडेश्वर साखर कारखान्यानं ऊसाचं दुसऱ्या क्रमांकाचं विक्रमी गाळप (Second Highest Cane Crushed) केलं आहे. राज्यातील ऊस गाळप हंगामात यंदा पहिल्या क्रमांकाचं गाळप माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, तर दुसऱ्या क्रमांकाचं गाळप जरंडेश्वर साखर कारखान्यानं केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं त्याबाबत वृत्त दिलं आहे. यंदाच्या हंगामातील राज्यातील दुसऱ्या क्रमांचं ऊस गाळप साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यानं (Satara Sugar Mill) केलं आहे. गेल्या हंगामात म्हणजे 2020-21 मध्ये जरंडेश्वरमध्ये 14.38 लाख टन ऊसाचं गाळप झालं होतं. त्याचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना 420.67 कोटी रुपये देण्यात आले होते. यंदाच्या हंगामात 2021-22 मध्ये जरंडेश्वरमध्ये 19.98 लाख टन ऊसाचं गाळप झालं. राज्यातील यंदाच्या गाळप हंगामातील एका कारखान्यात झालेलं ऊसाचं हे दुसऱ्या क्रमांकाचं विक्रमी गाळप आहे. सर्वांत जास्त ऊस गाळप विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यात यंदा झालं. सोलापूरमधील माढा तालुक्यातील या कारखान्यात यंदा 24.78 लाख टन ऊसाचं गाळप झालं. जरंडेश्वर साखर कारखान्यात यंदा 2.25 लाख टन साखरेचं उत्पादन झालं. राज्यातील साखरेच्या उत्पादनामध्ये या जरंडेश्वर कारखान्याचा तिसरा क्रमांक आहे. आतापर्यंत कारखान्याकडून शेतकऱ्यांना 531.79 कोटी रुपये देण्यात आले आहेत. हेही वाचा - सामूहिक आत्महत्या नसून हत्याकांड; सांगलीतील हसत्या-खेळत्या कुटुंबातील 9 जणांना एका क्षणात संपवलं  गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये जरंडेश्वर साखर कारखान्यावर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीची कारवाई करण्यात आली होती. राज्य सहकारी बँकेनं हा कारखाना खासगी कंपनीला विकताना आर्थिक घोटाळा केल्याच्या आरोपाखाली साखर कारखान्यावर ईडीनं जप्तीची कारवाई केली होती. त्याअंतर्गत कारखान्याच्या जागेवरही जप्तीची कारवाई झाली होती. या कारखान्याचा लिलाव कमी दरानं केल्याच्या आरोपावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या कुटुंबियांवर ईडीनं कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र हा लिलाव नियमानुसारच झाल्याचं सांगून अजित पवार यांनी हे आरोप धुडकावून लावले होते. 2003मध्ये माजी राज्यमंत्री शालिनीताई पाटील यांनी हा साखर कारखाना सुरु केला. मात्र शेतकरी आणि बँकेची थकित रक्कम वाढू लागल्यावर कारखाना अडचणीत सापडला होता. त्यानंतर खासगी कंपनीनं तो विकत घेतला. ईडीच्या कारवाईनंतर लगेचच आयकर विभागानंही कारखान्यावर कारवाई केली होती. गेल्या वर्षी ईडीच्या कारवाईनंतर सातारा जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या ऊसाच्या गाळपाबाबत चिंतेत होते. जिल्ह्यातील आणखी तीन कारखानेही यंदा बंद होते. त्यामुळे ऊस गाळपाचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र जरंडेश्वर साखर कारखान्याकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यामुळे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी हंगामाच्या सुरुवातीला जरंडेश्वरला ऊस गाळपाचा परवाना दिला. त्यामुळे जिल्ह्यातील वाई, खंडाळा, सातारा, कराड तालुक्यातील ऊस शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला.
First published:

Tags: Ajit pawar, Satara

पुढील बातम्या