Home /News /maharashtra /

मी रात्री बारा वाजता अमित शाहांना फोन केला, सांगितलं अटक करा, झुकेगा नहीं : संजय राऊत

मी रात्री बारा वाजता अमित शाहांना फोन केला, सांगितलं अटक करा, झुकेगा नहीं : संजय राऊत

पुण्यात ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते सचिन सावंत यांची संयुक्त मुलाखत घेतली. यावेळी संजय राऊत बोलत होते.

    पुणे, 4 जून : केंद्रीय तपास यंत्रणांकडून गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारमधील अनेक मंत्री आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरावर आणि त्यांच्या नातेवाईकांवर धाड टाकण्यात येत आहे. या धाडींना शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपण घाबरत नसल्याची प्रतिक्रिया दिली. आपल्या नातेवाईकांच्या घरी जेव्हा ईडीने धाड टाकली त्या रात्री आपण दिल्लीत होतो. धाडीच्या दिवशी रात्री बारा वाजता आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना फोन केला. त्यांना सांगितलं, मी दिल्लीत आहे. अटक करा. मी घाबरत नाही, असं संजय राऊत म्हणाले. पुण्यात ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांची संयुक्त मुलाखत घेतली. यावेळी महाराव यांनी ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. ईडी-आयटीच्या धाडी फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांवर का पडतात, भाजपवर का पडत नाही? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. त्यावर संजय राऊतांनी 2024 नंतर त्याचं उत्तर देऊ. आमचेही दिवस येतील. लोकशाही आहे. समोर लोक बसले आहेत. 2024 मध्ये त्याचं उत्तर मिळेल, असं उत्तर संजय राऊतांनी दिलं. त्यापुढे राऊतांना ईडीच्या धाडीचा त्रास होतो का? असा प्रश्न विचारला. त्यावर संजय राऊतांनी महत्त्वाचं विधान केलं. (नाना पटोलेंचा आपल्याच मित्रपक्षावर हल्लाबोल, अजित पवार, धनंजय मुंडेंवर सोडले टीकास्त्र) "त्रास म्हटला तर होतो. पण आपण त्रास करुन घ्यायचा नाही. जे होणारच आहे, आपल्यामागे ससेमिरा लावणारच आहे. एकदा कळल्यावर त्रास कशाकरता करुन घ्यायचा? आता माझ्यासारख्या माणसाची नसलेली प्रॉपर्टी जप्त केली. मी ज्या घरात राहतो ते घर, आणि माझी वडिलोपार्जित 40-45 गुंठे जमीन आहे. कोणतीही नोटीस न देता जप्त केली. आणि रोज अटक करा, असं चाललं आहे. मी निरोप दिला,अरे मी बसलोय, कधी अटक करणार? ज्यादिवशी माझ्या जवळच्या लोकांवर धाडी पडल्या, त्यादिवशी मी रात्री बारा वाजता दिल्लीत अमित शाहांना फोन केला होता. मी त्यांना सांगितलं, मी दिल्लीमध्ये बसलेलो आहे. माझ्यासाठी गरिबांना का त्रास देत आहात? मी बसलेलो आहे. मला अटक करा. आम्ही घाबरत नाहीत. पुष्पा चित्रपटातला डायलॉग आहे ना. झुकेंगा नहीं.", असं संजय राऊत रोखठोकपणे म्हणाले. "अडीच वर्षापूर्वी साधारण जेव्हा आमची देवाणघेवाण सुरु होती तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की हे काही शब्दाला जागणारे लोकं नाहीत. त्यावेळी मी शरद पवारांशी बोललो होतो. काहीतरी बदल व्हायला हवा. महाराष्ट्रात बदल करण्याचं सामर्थ्य हे शरद पवार यांच्यातच होतं. भाजपच्या वृत्तीचा मी फार मोठा अभ्यासक होतो. अडीच वर्षे वगैरे सोडून द्या. दिलेला शब्द पाळला असता की नाही? हा प्रश्न आहे. तो पाळला नाही. त्यामुळे  शिवसेनादेखील महाराष्ट्रात एक वेगळी भूमिका घेऊ शकते. तसेच इतर प्रमुख पक्षही एकत्र येऊन या राज्याला नवी दिशा देऊ शकतात ही जेव्हा दाखवण्याची संधी आली तेव्हा सगळ्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला. मला वाटतं की महाराष्ट्रातला हा प्रयोग असाच चालू राहिला तर देशामध्येही बदल घडविण्याची ताकद आपल्या राज्यामध्ये आहे. महाराष्ट्रात ताकद खूप आहे. तुम्ही पाहिलं का, गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रावर एवढे संकट आले, विविध माध्यमातून महाराष्ट्रावर संकट निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण कुणी वाकलं किंवा झुकलं का?", असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या