पुणे, 15 डिसेंबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डॅशिंग नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या पुणे (Pune) दौऱ्याआधीच मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे रुपाली पाटील कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा रंगली होती. पण अखेर रुपाली पाटील या राष्ट्रवादीत (ncp) प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यामुळे कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा रंगली होती. पण, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रुपाली पाटील या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहितीसमोर आली आहे. उद्या गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेणार असल्याची माहिती समोर आली आहे, असं वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले आहे. राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयात एका छोटोखानी कार्यक्रमात रुपाली पाटील आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.
दरम्यान, आज सकाळीच रुपाली पाटील यांनी मनसे पक्ष का सोडत असल्याचं स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांपासून मनसे नेत्या रुपाली पाटील या पुण्यातील मनसेचे नेते किशोर शिंदे आणि बाबू वागसकर यांच्यावर नाराज होत्या. या दोघांनाही काम नसून रिकामटेकडे असल्याची टीका त्यांनी पत्रकर परिषदेत केली आहे. त्यांनी याबाबत उघडपणे नाराजी देखील जाहीर व्यक्त केली होती. त्यांनंतर त्यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमाला देखील हजेरी लावली नव्हती.
निवडणुकीच्या तोंडावर मनसेला धक्का
पाटील यांची नाराजी दूर होईल असं सांगितलं जातं असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला राजीनामा दिल्याने पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. लवकर रुपाली पाटील राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहे असंही त्यांनी सांगितलं.
कुठून सुरू झाला वाद?
रूपाली पाटील यांचा सगळा वाद सुरू झाला तो समीर वानखेडे प्रकरणावर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर... समीर वानखेडे यांनी दलितांवर अन्याय केल्याचे आरोप होत आहेत तर त्याची चौकशी करायला हवी अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र त्यावरून पक्षाचे उपनेते बाबू वागस्कर आणि रूपाली पाटील यांच्यात वाद झाला होता. प्रवक्ते पद नसताना रूपाली पाटील यांनी पक्षाच्या भूमिका मांडायला नको असं वागस्कर यांचं म्हणणं होतं. मात्र रुपाली पाटील यांनी त्याला जोरदार विरोध केला.
वागसकर यांच्या पत्नीलाच शहराध्यक्ष पद देऊन माध्यमांना केवळ त्यांच्याशीच बोलावं असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे रूपाली पाटील कमालीच्या दुखावल्या होत्या. आपण सगळ्या तक्रारी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या मात्र त्यावर काहीही कारवाई झाली नाही. आपला आता त्यांच्यावर कुठलाही रोष असून कालही आपले दैवत होते आजही आहे आणि उद्याही राहतील अस ही रुपाली पाटील यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.