पुणे, 14 डिसेंबर : मनसेच्या (mns) डॅशिंग नेत्या म्हणून ओळख असलेल्या रुपालीताई ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. पण, राज ठाकरेंना रे (raj thcakery) भेटण्याआधीच राजीनामा का दिला या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची (ajit pawar) भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या (ncp) वाटेवर असण्याची चर्चा आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या दौऱ्यावर उद्या पुण्यात येत आहे. पण राज ठाकरे पुण्यात पोहोचण्याआधीच रुपाली पाटील ठोंबरे यांनी राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली. रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. एकीकडे मनसेकडून पुणे पालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरू असताना रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वीच रुपाली पाटील यांनी पक्षातील अंतर्गत कलहामुळे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षांतर्गत वादामुळे मनसेला रामराम ठोकल्याचं बोललं जात आहे.
तर दुसरीकडे रुपाली पाटील या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आल्या होत्या. कोरोनाच्या काळात कामानिमित्ताने अनेक वेळा रुपाली पाटील या अजितदादांच्या बैठकीला हजर होत्या. रुपाली पाटील राष्ट्रवादी नेत्या कार्यक्रमाला आणि बैठकीला हजर राहिल्यामुळे त्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. पण, वैयक्तिक कामानिमित्ताने भेट होती असं सांगून रुपाली पाटील यांनी चर्चांना पूर्णविराम दिला होता. पण, आता रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे त्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
रुपाली पाटील यांचं पत्र
मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद आणि "श्री.राज ठाकरे" हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल' अशी भावना व्यक्त करत ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे.
रुपाली पाटील यांची पुण्यात मनसेच्या आक्रमक नेत्या आणि डॅशिंग नेत्या म्हणून ओळख होती. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष कामं केली. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे.
याआधी त्यांनी पुणे महापालिकेत त्या माजी नगरसेविका होत्या. मनसेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्षा आणि पुणे मनसेच्या महिला शहराध्यक्षापदही भुषावले होते. तसंच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुद्धा रुपाली पाटील यांनी लढवली होती. पण, यात त्यांचा पराभव झाला.
राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) औरंगाबादच्या दौऱ्यानंतर तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर (pune) येणार आहे. हा दौरा 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान होणार आहे.या दौऱ्यात राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांबरोबर वैयक्तिक पातळीवर संवाद साधून त्यांचे मत जाणून घेणार आहे.त्याच बरोबर येणाऱ्या निवडणुकीची रणनीती या दौऱ्यात ठरवण्यात येणार आहे.
राज ठाकरे हे उद्या बुधवारी पुण्यात येणार आहे.आणि सकाळी 9 ते 11 शिवाजी नगर मतदार संघ आणि त्यानंतर 12 ते 2 कोथरूड मतदार संघ 4:30 ते 5:50 वाजता खडकवासला मतदार संघ आणि संध्याकाळी 6 ते 7:30 वाजता हडपसर मतदार संघ अशी बैठक होणार आहे. तर 16 डिसेंबरला सकाळी 9 ते 11 वाजता कसबा मतदारसंघ 12 ते 2 पर्वती मतदारसंघ दुपारी 4 ते 5:30 वाजता कॅन्टोन्मेंट मतदार संघ आणि संध्याकाळी 6 ते 7:30 वाजता वडगावशेरी मतदार संघाची बैठक घेणार आहे.शुक्रवारी 17 डिसेंबर ला आजी माजी नगरसेवक यांची बैठक होणार आहे, अशी माहिती यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.