पुणे, 22 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे सभा झाली. या सभेत राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राणा दाम्पत्य, संजय राऊत, ओवैसींवर निशाणा साधला आहे. त्यासोबतच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सुरू असलेलं राजकारण, टोल नाका आंदोलन, अयोध्या दौरा या सर्व प्रश्नांवर भाष्य केलं आहे.
राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
राज ठाकरे यांचा दौरा स्थगित करण्यावरुन विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. पण आज अखेर याबाबत स्वत: भाष्य केलं आहे. आज राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत म्हटलं, माझ्या पायाचं दुखणं सुरू आहे. त्यामुळे कमरेला त्रास होतो. म्हणून मी पुण्यातून मुंबईला गेलो. डॉक्टरांशी बोललो, तर येत्या 1 तारखेला शस्त्रक्रिया करतोय. पायाचं दुखणं सुरू आहे त्यामुळे कमरेला त्रास होतोय. ...मुद्दाम सांगितलं नाहीतर पत्रकार नको ते अवयव काढतील.
अयोध्या दौऱ्याला विरोध हा एक सापळा
राज ठाकरे म्हणाले, अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्याचं म्हटलं. अनेकांना वाईट वाटलं, अनेकांना आनंद झाला. अनेकजण गुपचूप बोलू लागले. मी मुद्दाम मध्ये दोन दिवस घेतले. की काय बोलायचं ते बोलून घ्या एकदाचं. मग माझी भूमिका महाराष्ट्र, देशाला सांगेल असं म्हटलं. ज्या दिवशी मी लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली आणि त्यानंतर अयोध्येला जाणार याच्या तारखेची घोषणा पुण्यात केली. त्यानंतर काही दिवसातच हे सर्व प्रकरण सुरू झालं. की, अयोध्येला जाणार नाही. मग ते प्रकरण सर्व वाढू लागलं. मी सर्व पाहत होतो की काय सुरू आहे. मला मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेशातून काही गोष्टींची माहिती मिळत होती की नेमकं काय चाललं आहे. एक वेळ आली आणि माझ्या लक्षात आलं की, हा एक ट्रॅप आहे, हा सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकलं नाही पाहिजे. ही सर्व गोष्टींची सुरुवात झाली त्याची रसद पुरवली गेली त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. की या सर्व गोष्टी पुन्हा बाहेर काढा. ज्यांना-ज्यांना माझी अयोध्यावारी खूपली असे अनेकजण होते. त्या सर्वांनी सर्वगोष्टी मिळून सर्व आराखडा आखला. मी एकाच गोष्टीचा विचार केला.. मी खरंतर अयोध्येला जाणार. रामजन्मभूमीचं दर्शन घेणं हे आलंच.
वाचा : माफी मागायला लावणारे 15 वर्षे गप्प का बसले?, राज ठाकरेंचा बृजभूषण यांच्यावर निशाणा
अनेकांना भावना समजत नाहीत
तुमच्यापैकी अनेकजण जन्मालाही आले नसतील तेव्हा आजच्या सारखी चॅनल्स नव्हती. मला आजही आठवतंय... ज्यावेळी मुलायम सिंग यांचं उत्तरप्रदेशात सरकार होतं. ज्यावेळी भारतातील सर्व ठिकाणाहून अयोध्येला गेले होते तेव्हा सर्व कारसेवकांना ठार मारण्यात आलं होतं. त्या सर्व कारसेवकांची प्रेत शरयू नदीत तरंगताना मी व्हिडीओत पाहिलं होतं. मला रामजन्मभूमीचं तर दर्शन घ्यायचंच आहे प्रश्नच नाही. पण जिथे कारसेवक गेले आणि जिथे मारले गेले ती जागा अयोध्येला आहे त्याचंही दर्शन मला घ्यायचं आहे. असो... राजकारणात भावना अनेकांना समजत नाहीत असंही राज ठाकरे म्हणाले.
ऐन निवडणुकीच्यावेळी कार्यकर्त्यांना गमवायचं नाही
राज ठाकरेंनी पुढे म्हटलं, मला माहिती आहे की जर अयोध्येला गेलो तर राज्यातील हजारो महाराष्ट्रसैनिक, अनेक हिंदू बांधव तिकडे अयोध्येला आले असते आणि तिकडे जर काही झालं असतं तर आपली पोरं तर अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या असत्या. तुम्हाला जेलमध्ये सडवलं गेलं असतं. आणि काहीही कारण नसताना तुमच्यावर अनेक केसेस टाकून जेलमध्ये टाकलं असतं. त्यानंतर तुम्हाला जेलमध्ये सडवलं असतं. मी म्हटलं आपली पोरं अशी घालवणार नाही. सर्व पदाधिकाऱ्यांवर, तुमच्यावर केसेस टाकल्या असत्या आणि ऐननिवडणुकीवेळी इथे कुणीही नसतं. हा सर्व ट्रॅप होता. मी जात नाही म्हणून चार शिव्या खायला टीका सहन करायला मी तयार ,त्यासाठी मी हकनाक पोर नाही घालवणार...
"मातोश्री बंगला हा काय मशीद आहे का?"
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा बोलण्याचं आव्हान दिलं. त्यावरुन मुंबईत मोठा गदारोळ झाला. याच मुद्यावरुन राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याला चांगलेच सुनावले आहे. राज ठाकरेंनी म्हटलं, राणा दाम्पत्य... मी सांगितलं काय होतं की, जर मशिदीबाहेर जोरात भोंगे वाजले तर त्याच्यासमोर हनुमान चालिसा लावा. अनेक ठिकाणी लावली गेली. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा लावण्याचं बोलू लागले. आणि मग ते इतकं प्रकरण झालं की, त्यांना अटक झाली. मग ते जेलमध्ये होते... मग ते मधू इथे चंद्र तिथे... या सर्व गोष्टींनंतर ते एकत्र आले त्यांना सोडून देण्यात आलं.
शिवसेनेकडून त्यांना बोलण्यात आलं ते सुद्धा शिवसेनेविरोधात बोलत होते. इतका सर्व राडा तुम्ही सर्वांनी टीव्हीवर पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेत काम करणारे लोक आहेत... जे शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत त्यांना या सर्व गोष्टींचं काहीच वाटत नाही का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांवरही निशाणा
त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय सुरू आहे कळतंच नाही. आमचं खरं हिंदुत्व, त्यांचं खोटं हिंदुत्व... वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही... तुम्हारी कमीज हमारी कमीज से सफेद कैसी. प्रश्न असा आहे ना की, खरं हिंदुत्व काय आहेत याचे रिझल्ट हवे आहेत.. जे आम्ही देत आहोत. महाराष्ट्रातील मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला
पुण्यातल्या अनेक मैदानांनी सभांना नकार दिला. आता आम्हाला मैदान नाही, तर कुणालाच द्यायचं नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं. सध्याचे पावसाळी हवामान पाहता पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं?, अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला मारला आहे. तसंच पावसाच्या शक्यतेमुळे हॉलमध्ये सभा घेत असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
अर्धवट सोडलेलं एक आंदोलन सांगा
राज ठाकरे म्हणाले, मी अर्धवट आंदोलन सोडल्याचं एक उदाहरण सांगा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच 64 ते 70 टोलनाके बंद झाले. इतर पक्षांची काही जबाबदारी नाहीये का.
''तू आहेस कोण?'', मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत राज ठाकरेंची टीका
राज ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोमणा मारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फक्त सांगावं त्यांच्यावर एक तरी केस आंदोलनाची आहे का, असा सवाल करत राज ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला धारेवर धरले.
मुंबईच्या सभेत तर ते औरंगाबादच्या नामांतराची गरजच काय, असेही बोलले. पण उद्धव ठाकरे आहेत तरी कोण? तुम्ही महात्मा गांधी किंवा वल्लभभाई पटेल आहात का?, असा शब्दांत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Pune, Raj Thackeray, Uddhav thackeray