पुणे, 28 डिसेंबर : पुण्यातील (Pune) नवले पुलाजवळ सातत्याने होणाऱ्या अपघाताची मालिका थांबण्याची चिन्हे अजून तरी दिसत नाहीये. याठिकाणी आज पुन्हा एकदा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यात तीन जणांचा मृत्यू (3 died in accident) झालाय. उतारावर कंटेनर मागे सरकल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांना त्याची धडक बसल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. (Major accident in Pune near Nawale bridge)
मिळालेली प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून सातार्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर हा कंटेनर उताराच्या दिशेने पाठीमागे सरकत गेला. यामध्ये पाठीमागे असणाऱ्या काही वाहनांना त्याची धडक बसली. यामध्ये काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
पुणे-सातारा महामार्गावर हा अपघात झाला आहे. सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. गाडीची वाट पाहत काही नागरिक रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यावेळी कंटेनर मागे आला आणि हा भीषण अपघात घडला आहे.
नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरूच
यापूर्वी 5 नोव्हेंबर रोजी भीषण अपघात झाला होता. वडगाव परिसरात ब्रेक फेल झाल्याने एका भरधाव ट्रकने चार वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणताही जीवितहानी झाली नाही. या अपघातात एक जण जखमी झाला असून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले होते. मुंबई-बंगळुरू महामार्गावर सकाळी नऊच्या सुमारास वडगाव परिसरात हा अपघात घडला. तांदळाची पोती घेऊन कर्नाटककडून मुंबईकडे जात असलेल्या माल ट्रक (क्रमांक KA 17 D 0321) वडगाव बुद्रुक येथील हॉटेल विश्वाससमोर पोहोचला होता, त्यावेळी अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि समोर येईल त्या वाहनांना ट्रकने धडक दिली. या ट्रकचा वेग इतका होता की, त्याने रस्त्यातील चार ते पाच गाड्यांना बाजूला फेकले. पण, पुढे जाऊन एक दुचाकी ट्रकच्या खाली सापडली गेली. त्यामुळे ट्रकचा वेग हा कमी झाला आणि काही वेळाने तो जागेवरच थांबला.
वाचा : पुण्यात पोलीस आणि गुंडांमध्ये सिनेस्टाईल झटापट
पुण्यात नऱ्हे सेल्फी पॉईंटजवळ भीषण अपघात
29 ऑक्टोबर रोजी पुणे - बंगळुरू महामार्गावर नऱ्हे सेल्फी पॉईंटजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. भरधाव कंटेनर हायवेवरुन थेट सर्व्हिस रोडच्या हॉटेलवर धडकला. ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला होता.
21 ऑक्टोबर 2021 रोजी नवले पुल परिसरातील सेल्फी पॉइंट जवळ झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले होते. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजणेच्या सुमारास घडली. सातारा दिशेकडून मुंबई दिशेकडे निघालेल्या एका कंटेनरने पिकअप वाहनाला धडक दिली. त्यामुळे पिकअप वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन दुचाकीना पिकअपची धडक बसली. जखमींना नऱ्हे गावाचे उपसरपंच सागर भूमकर, डॉ. एन बी आहेर व कार्यकर्त्यांनी उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.