पुणे, 31 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वयाच्या 80 वर्षांनंतरही आज इतक्या बैठका आणि दौरे करत असतात. तरुणांनाही लाजवेल अशी ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे, असं म्हटलं जातं. त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेता अजित पवार हे सुद्धा सकाळपासूनच कामाला सुरुवात करतात, अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या फिटनेसबाबतही बोललं जातं.
यानंतरच मग पवार कुटुंबातील आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे खासदार सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे या नियमित जिम करतात. त्यासुद्धा फिजिकली फिट आहेत. अशाप्रकारे असलेल्या पवार कुटुंबीयांच्या फिटनेस पॅटर्नचा प्रत्यय आज आला. कारण सुप्रियाताईंनी आज किल्ले राजगड सर केला.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंदवी स्वराज्याची प्रथम राजधानी असलेल्या किल्ले राजगडावर आपल्या सहकाऱ्यांसह भेट दिली. यावेळी खासदार सुळे यांनी गड आणि किल्ले यांच्या विकासाबरोबरच परिसराच्या विकासासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात हा दौरा आयोजित केला होता.
हेही वाचा - Pune : येरवडा मनोरुग्णालयची सुरुवात कधी आणि कशी झाली? पाहा video
राजगड सर करण्यामागे काय कारण?
खासदार सुळे यांनी राजगडावर जाऊन प्रत्येक ठिकाणाची तंतोतंत माहिती घेतली शिवाय न थांबता न थकता त्यांनी राजगड सर केला. किल्ले राजगडाबरोबरच बारामती मतदारसंघातील ज्या ज्या तालुक्यांमध्ये गड किल्ले गडकोट आहेत त्या ठिकाणांचा विकास करतानाच गड किल्ल्यांच्या परिसराचाही विकास करण्यासंदर्भात विशेष मोहीम राबवली आहे, त्याचाच भाग म्हणून त्यांनी आज किल्ले राजगडावर भेट दिली. प्रत्येक ठिकाणी जाऊन ऐतिहासिक स्वरूपात गडकोटांची दुरुस्ती कशी करता येईल याची माहिती घेतली. त्यांचे समवेत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे -
गड, किल्ले आपला इतिहास नाही तर आपले संस्कार आहेत. हे महाराष्ट्रातील आणि भारतातील प्रत्येक युवक युवतीने पाहिले पाहिजेत. त्यांचा अभ्यास केला पाहिजे. छत्रपतींचे फक्त नाव घेऊन चालणार नाही तर तसं वागलं पाहिजे. त्यांच्यासारखी कृती प्रत्येकाने केली तर महाराष्ट्र या देशात एक नंबर होईल आणि भारत हा जगात एक नंबर होईल, असे खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Sharad Pawar, Supriya sule