Home /News /maharashtra /

शरद पवारांनी नातूच्या मंत्रीपदाबाबत दिले स्पष्ट संकेत, रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

शरद पवारांनी नातूच्या मंत्रीपदाबाबत दिले स्पष्ट संकेत, रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुण्यात एका कार्यक्रमात त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक विधान केलं.

पुणे, 4 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पुण्यात (Pune) एका कार्यक्रमात त्यांचे नातू आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. रोहित पवार आमदार झाले आहेत. ते नामदार (मंत्री) कधी होणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी सूचक विधान केलं. आपल्याला नामदार होण्यासाठी आमदार होवून पाच वर्ष लागली होती. त्यानंतर आपण नामदार झालो होतो, असं विधान शरद पवारांनी केलं. त्यामुळे रोहित पवार पुढच्या काही वर्षांनी नामदार म्हणजेच मंत्री होतील, असे स्पष्ट संकेत शरद पवारांनी दिले आहेत. शरद पवारांच्या या संकेतांवर आम्ही रोहित पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रोहित पवार काय म्हणाले? "कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला शरद पवार यांनी त्यांच्या अनुभवातून दिलेलं उत्तर आहे. पद वगैरे नंतर येतं. मी आज ज्यासाठी आमदार झालो आहे, मी माझ्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रातील युवा वर्ग हा परिवार आहे. त्यांचे प्रश्न विधानसभेतून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतोय. यापुढे अजून ताकद मिळाली तर नक्कीच अजून जास्त ताकदीने मी युवावर्गासाठी काम करेन", असं रोहित पवार म्हणाले. (रोहित पवार नामदार होणार का? शरद पवारांच्या उत्तराने कार्यकर्ते अवाक्) यावेळी आम्ही रोहित पवारांना मंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी आपण पद वगैरेचा विचार करत नाही, असं सांगितलं. "माझी आवड ही लोकांची सेवा आहे. लोकांची ज्या ज्या खात्यांमधून सेवा करता येईल त्या खात्यांमधून मला काम करायला आवडेल. मला जे करता येईल ते मी करेलच. पण माझ्या डोक्यात पद वगैरे नाही. माझ्याकडे सध्या आमदार हे खूप मोठं पद आहे. त्या माध्यमातून जेवढं जास्त चांगलं काम करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय. मी यापुढे जे कुठलं पद असेल त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन", असं रोहित पवार म्हणाले. "माझा सर्वसामान्य जनता, कार्यकर्ते आणि नेत्यांवर विश्वास आहे. योग्यवेळी निर्णय घेतला जाईल. मी फक्त आमदारकीची संधी द्यावी, अशी विनंती केली होती. त्या विनंतीला मान देवून त्यांनी संधी दिली", असंदेखील रोहित पवार म्हणाले.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या