पुणे, 25 डिसेंबर: 29 वर्षांपूर्वी पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील (Pune) एका महिलेनं आपल्या अल्पवयीन मुलीसोबत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Mother and minor daughter commits suicide by jump into well) केली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी पतीला दोषी ठरवून त्याची शिक्षा कायम ठेवली आहे. पीडित महिलेच्या आत्महत्येनंतर तब्बल 29 वर्षांनी न्यायालयाने न्याय दिला आहे. मुंबई उच्चन्यायालयाने आरोपी पतीला तीन वर्षांचा सश्रम कारावास सुनावला आहे.
रामदास ढोंडू कलाटकर असं शिक्षा झालेल्या दोषी पतीचं नाव आहे. तर जनाबाईस कलाटकर असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे. जनाबाई यांनी 9 ऑक्टोबर 1992 साली आपल्या अल्पवयीन मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दोषी रामदास कलाटकर याला जनाबाई यांच्यापासून दोन मुली झाल्या होत्या. पण मोठ्या मुलीचं आकस्मिक निधन झालं होतं. यानंतर दुसरी मुलगी जन्माला आल्यानंतर जनाबाई काही दिवसांसाठी आपल्या माहेरी जाऊन राहिल्या होता.
काही महिन्यांनी त्या जेव्हा परत आल्या, तेव्हा पती रामदास हा भारती नावाच्या अन्य महिलेसोबत राहत असल्याचं त्यांना कळालं. यानंतर जनाबाई देखील रामदास यांच्यासोबत राहू लागल्या. पण काही दिवसांत पती सासू-सासरे आणि भारती नावाची महिला पीडित जनाबाई यांना त्रास देऊ लागले. सतत मारहाण आणि अपमानास्पद वागणूक दिल्याबाबत जनाबाई यांनी आपल्या घरच्यांना सांगितलं होतं. त्यानंतर जनाबाईच्या आई आणि वडिलांनी रामदास आणि त्याच्या कुटुंबीयांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. त्यांनी जनाबाई यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देणं सुरूच ठेवलं.
हेही वाचा-गरोदर पत्नीसोबत पतीचं राक्षसी कृत्य; दोन जीवांच्या महिलेनं जन्माआधीच गमावलं बाळ
शेवटी आरोपींच्या त्रासाला कंटाळून जनाबाई यांनी 9 ऑक्टोबर 1992 रोजी आपल्या अल्पवयीन मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर मृत जनाबाई यांचा भाऊ भानुदास दरेकर यांनी आरोपी पती रामदास कलाटकर याच्यासह त्याची आई नखुबाई आणि भारती यांच्याविरोधात छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवल्यानंतर पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालायाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवलं. याप्रकरणी न्यायालयाने पतीला 3 वर्षांचा सश्रम कारावास सुनावला तर भारती नावाच्या महिलेला सहा महिन्यांचा साधा कारावास सुनावला. या सुनावणी दरम्यान सासू नखुबाई यांचं निधन झालं होतं.
हेही वाचा-अजब! तीन महिन्यांनंतर 'मृत' पती सापडला 'जिवंत', धक्कादायक कारण आलं समोर
यानंतर दोन्ही आरोपींनी पुणे सत्र न्यायालयाच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. यावर सुनावणी केल्यानंतर घटनेच्या 29 वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाने पुणे सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. न्यायालायने दोषी पतीची तुरुंगात रवानगी केली आहे. पण या सुनावणी दरम्यान काही वर्षांपूर्वी भारती नावाच्या महिलेचंही निधन झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, High Court, Mumbai, Pune