पुणे, 29 नोव्हेंबर: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात सर्वत्र ढगाळ हवामानाची (Cloudy Weather) नोंद करण्यात आली आहे. तसेच अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low Pressure Area) गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळला आहे. अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे. याचा जबरदस्त फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
हवामान खात्याने पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने पुण्यासह, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ (Yellow alert) जारी केला आहे.
हेही वाचा-विकेंडनंतर राज्यात पुन्हा पावसाचं कमबॅक; पुण्यासह या जिल्ह्यांना IMD कडून इशारा
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि सध्या दक्षिण अंदमान समुद्रात निर्माण होत असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे 30 डिसेंबरपासून पुढील तीन दिवसांमध्ये राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हेही वाचा-Omicronचा धोका वाढला; परदेशातून येणाऱ्यांसाठी बदलले नियम,जाणून घ्या नवी नियमावली
अलीकडेच कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. गहू, हरभरा, ऊस या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे गव्हाचे पिक भुईसपाट झालं होतं. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची भीतीही शेतकऱ्यांना सतावत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather forecast, महाराष्ट्र