पुणे, 2 ऑक्टोबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज (2 ऑक्टोबर 2022) सर्वत्र साजरी केली जात आहे. स्वातंत्र्य चळवळीत गांधीजींचे मोलाचे योगदान होते. त्यांनी अहिंसा हा मंत्र जगाला दिला. ब्रिटीशांविरूद्ध सामान्य भारतीयांची एकजूट सत्याग्रह आंदोलनातून केली. पुणे शहरातील आगाखान पॅलेसमध्ये गांधीजींच्या अनेक आठवणी आहेत. या पैकी एक आठवण त्यांच्या वाढदिवसाची आहे. गांधी जयंती निमित्त ही आजवर कुणाला फारशी माहिती नसलेली आठवण आम्ही सांगणार आहोत.
ऐतिहासिक वारसा
आगाखान पॅलेस ही ऐतिहासिक इमारत इमारत पुण्याच्या येरवडा येथे आहे. ही इमारत सुलतान मुहम्मद शाह आगा खान तृतीय यांनी 1892 मध्ये बांधली होती. 1942 साली 'चलेजाव चळवळ' सुरू झाल्यावर 10 ऑगस्ट 1942 साली ब्रिटिश सरकारने महात्मा गांधीजी, कस्तुरबा गांधीजींचे स्वीय सचिव महादेवभाई देसाई आणि प्यारेलाल तसंच काही काळानं गांधीजींच्या शिष्या मीराबेन आणि वैद्यकीय सल्लागार डॉ. एम. डी. डी. गिल्डर यांनाही या पॅलेसमध्ये नजरकैद ठेवण्यात आले. तब्बल 21 महिने महात्मा गांधी याच आगाखान पॅलेसमध्ये नजरकैद होते. अखेर 6 मे 1944 साली महात्मा गांधी यांची सोडण्यात आले.जयप्रकाश नारायण यांच्या पत्नी प्रभावती, सरोजिनी नायडू यांनाही काही काळ येथे ठेवण्यात आले होते.
या पॅलेसमध्ये पुण्यातील ब्रिटिशांच्या दडपशाहीच्या विरोधात गांधीजींनी येथेच 21 दिवस उपवास सुरू केला. कस्तुरबा आणि महादेव देसाई यांचे निधन याच पॅलेसमध्ये तुरुंगवासाच्या काळातच झाले. महालाच्या एका कोपऱ्यात या दोघांची समाधी आहे. कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांच्यावरील अंत्यसंस्कार पॅलेसच्या बाहेर करावे, अशी गांधीजींची इच्छा होती. मात्र ब्रिटिशांनी याला नकार देऊन पॅलेसमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायला लावले.
गुगल मॅपवरून साभार
गांधी संग्रहालय
गांधीजी ज्या खोल्यांचा वापर करायचे त्याचे संग्रहालयात रूपांतरित केले आहेत. त्यामध्ये गांधीजींच्या वापरण्यातल्या वैयक्तिक वस्तू भांडी,चपला,कपडे आणि पत्र ठेवले आहेत. महात्मा गांधींजींच्या स्वातंत्र्य चळवळीतील काही छायाचित्रं देखील या पॅलेसमध्ये आहेत. या इमारतीत चित्रांच्या माध्यमातून गांधीजींच्या आयुष्यातील घटना मांडण्यात आल्या आहेत.
Gandhi Jayanti 2022: अस्पृश्यतेला छेद देणारी नागपुरातील 'गांधी विहीर', पाहा Video
वाढदिवसाची गोष्ट
महात्मा गांधी आगाखान पॅलेसमध्ये नजर कैदेत होते त्यावेळी दोन वेळा त्यांचा वाढदिवस इथं साजरा झाला. वास्तविक गांधीजींना वाढदिवस साजरा करण्याची इच्छा नव्हती. तरीही त्यांच्या सहकाऱ्यांनी निश्चय केला होता. त्यांनी 2 ऑक्टोबरचे खास प्लॅनिंग केले होते.
अगदी साधारण राहणीमान असणाऱ्या महात्मा गांधीजींचा आहार कसा होता?
गांधीजींना 2 ऑक्टोबर रोजी सकाळी बकरीच्या आवाजाने जाग आली. त्यांनी सहकाऱ्यांना 'हा काय प्रकार आहे?' अशी विचारणा केली. त्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी 'तुम्हाला वाढदिवासाच्या निमित्तानं ही बकरी आम्ही भेट दिली आहे.'असे सांगितले. ही प्रेमळ भावना लक्षात घेऊन गांधीजी हसले. त्या दिवशी सरोजनी नायडू यांनी त्या दिवशी जेवण तयार केले होते. त्या जेवणात कोबीचे सूप हा विशेष मेनू होता, अशी आठवण आगाखान पॅलेसमधील गाईड नीलम महाजन यांनी सांगितली आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर आगाखानांच्या वंशजांनी हा पॅलेस आणि त्याच्या आजूबाजूची 16 एकर जागाही गांधी स्मारक निधीला दान केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mahatma gandhi, Pune, पुणे, महात्मा गांधी