पुणे, 28 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi Government) स्थापन होऊन आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. पण दुसरीकडे विरोधकांकडून हे सरकार मार्च-एप्रिल महिन्यात पडेल असे दावे करण्यात येत आहेत. भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी याबाबत विधान केलं. त्यानंतर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देखील राणेंच्या सुरात सूर मिसळला. हेही असे की थोडके विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी देखील भाजपचं सरकार नक्की येईल, असं काल विधान केलं. भाजप नेत्यांच्या या वक्तव्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शेरोशायरीतून प्रत्युत्तर दिलं. "सौ दर्द छुपे है सिने में, मगर अलग मजा है जिने मे", अशा शायरीतून भुजबळ यांनी विरोधकांवर टीका करायला सुरुवात केली.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने समता पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आज पुण्यात आयोजन करण्यात आलं. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना यावर्षी समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात छगन भुजबळ यांनी भाषण करताना शेरोशायरीतून विरोधकांवर चौफेर निशाणा साधला.
छगन भुजबळ भूपेश बघेल यांना उद्देशून संघर्षाविषयी बोलत होते. यावेळी त्यांनी आम्हाला काही कमी त्रास नाही. खूप अडचणी आहेत, असं म्हटलं. सौ दर्द छुपे है सिने में, मगर अलग मजा है जिने में, अशी शायरी म्हटली. "आमच्या सरकारला आज दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. आजच्याच दिवशी मंत्रिमंडळाने शपथ घेतली होती. पण हे सरकार स्थापन झालेलं अजूनही अनेकांना पचनी पडताना दिसत नाहीय. कुणी हे सरकार आता पडणार, कुणी फ्रेब्रुवारी, कुणी डिसेंबर तर कुणी 15 दिवसात हे सरकार जाणार, असं म्हणतं. अरे पण कुठे जाणार? कुणीच कुठे जाणार-येणार नाहीय. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं सरकार पूर्ण पाच वर्ष टीकणार. त्यानंतर पुन्हा निवडून येईल", असं भुजबळांनी ठणकावून सांगितलं.
हेही वाचा : ''सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद'', मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून मानले जनतेचे आभार
"पुणे विद्यापीठात 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा बसवला जाईल. तसेच भिडेच्या वाड्याचं शाळेचं काय झालं? हे विचारणारे खूप भेटतात. पण त्यांना फुले वाड्यात कधी यावसं वाटत नाही. असो, पण अखेर आम्हीच तोही निर्णय घेतलाय. होय भिडे वाड्यात मुलींचीच शाळा सुरु होणार. पुणे मनपाच ही शाळा चालवणार", असं भुजबळांनी यावेळी स्पष्ट केलं.
"केंद्र सरकारला ओबीसींची जनगणना करायला का त्यावेळी आम्ही भाग पाडलं. पण केंद्रात भाजपचं सरकार येताच ओबीसींचा डाटा द्यायला नकार घंटा सुरु झाली. केंद्राच्या या आडमुठ्या भूमिकेमुळेच ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं आणि वरुन भाजपचे नेते ओबीसी जनजागरण मोर्चा काढत आहेत. हा निव्वळ दुटप्पीपणा आहे. गायी-म्हशींची जनगणना करता मग ओबीसींची का नाही?", असा सवाल भुजबळांनी केला.
हेही वाचा- दिल्लीच्या टीमला चिअर करण्यासाठी पोहचली Sunny leone, पाहा VIDEO
"शेवटी मोदी सरकारलाही शेतकऱ्यांच्या लढ्यापुढे छुकावं लागलंच ना. म्हणूनच लढत रहा. काही लोक 2014 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं असं बोलतात. मग सावरकर स्वातंत्र्यवीर कसे बनले?", असा सवाल करत भुजबळांनी अभिनेते विक्रम गोखलेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.