मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पेपरफुटीची CBI चौकशी करण्याची विरोधकांची मागणी; अजित पवार म्हणाले, "सुशांतसिंह प्रकरणात काय झालं? शेवटी...."

पेपरफुटीची CBI चौकशी करण्याची विरोधकांची मागणी; अजित पवार म्हणाले, "सुशांतसिंह प्रकरणात काय झालं? शेवटी...."

File Photo

File Photo

Ajit Pawar reaction on paper leak case: राज्यभरात पेपरफुटीच्या प्रकरणावरुन खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची भाजपकडून वारंवार मागणी होत आहे. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे, 25 डिसेंबर : महाराष्ट्रातील आरोग्य भरती, म्हाडा आणि टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून कोट्यवधी रुपयांचं घबाड जप्त करण्यात येत आहे. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी (Opposition demand cbi inquiry of paper leak case) व्हायलाच हवी अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Dycm Ajit Pawar) भाष्य करत विरोधकांना उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे पोलीस आयुक्तांचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. ते याच्या मुळापर्यंत जातील याची आम्हाला खात्री आहे. हे प्रकरण समाजाला अडचणीत आणणारे आणि घातक आहे. असं पुन्हा घडू नये. यात राजकारण आणू नये. सीबीआयला भरपूर कामं आहेत.

आपले पोलीस सक्षमपणे काम करते. याआधी ही आपण सीबीआयला खूप प्रकरणे सोपवली. सुशांत सिंह प्रकरणात काय झालं? शेवटी आत्महत्या आहे हेच पुढं आलं. उगाच आभास करू नये. आपली पोलीस यंत्रणा कमी पडली तर दुसऱ्या कोणाची मदत घ्यायची की नाही हे पाहू असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

वाचा : TET परीक्षा घोटाळा: परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक

देवेंद्र फडणवीसांनी केली होती सीबीआय तपासाची मागणी

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे 88 लाख रुपये सापडल्यानंतर आणखी 2 कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच 3 महिन्यात बाहेर काढले. मग या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलीस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केली.

सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की,लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा अशी मागणी देवेंद्र फडवणीस यांनी केली.

वाचा : पेपरफुटी प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक

25 किलो चांदी आणि 2 किलो सोने जप्त

टीईटी घोटाळ्यातील आरोपी अश्विन कुमार याला कर्नाटकातील बंगळुरू येथून अटक केली आहे. त्यानंतर त्याच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता पोलिसांना मोठं घबाड आढळून आलं आहे. अश्विन कुमार याच्या घरातून 25 किलो चांदी आणि 2 किलो सोन जप्त करण्यात आले आहे. पेपरफुटी प्रकरणात अश्विन कुमार हा प्रीतिश देशमुख बरोबर काम करत होता.

तुकाराम सुपेंच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

आरोग्य भरतीनंतर, म्हाडा आणि आता टीईटी पेपरफुटी प्रकरणाने राज्यातील वातावरण तापून निघालं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली. पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता. यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. छापेमारीत आरोपी सुपे याच्या घरात पोलिसांना दोन कोटीहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले आहेत. सुपे यांच्या घरी छापा टाकायच्या आधी पत्नी आणि मेहुण्याने ही रक्कम दुसऱ्या ठिकाणी लपवली होती.

First published:

Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis, Pune