पुणे, 25 नोव्हेंबर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अण्णा हजारे यांना छातीत दुखू लागल्याने आज सकाळी रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अण्णा यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर एन्जॉग्राफी झाली असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
रुबी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अवधूत बोदमवाड यांनी अण्णा यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे. "छातीत दुखू लागल्याने अण्णा हजारे यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे", अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Anna Hazare was admitted to Ruby Hospital in Pune following chest pain. He has been kept under observation and stable: Dr Avdhut Bodamwad, Medical Superintendent, Ruby Hall Clinic
(File photo) pic.twitter.com/3yGt4t6UsV — ANI (@ANI) November 25, 2021
हेही वाचा : मोठी बातमी ! विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर नाही तर मुंबईतच होणार
दरम्यान, अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरु आहे. मात्र आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यावर त्यांनी अण्णांच्या प्रकृतीला आराम मिळावा, अशी भावना व्यक्त केली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची तब्येत ठणठणीत असून काळजीचे कोणतेही कारण नाही. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनीधींकडून सातत्याने विचारणा होत असल्याने ही अधिकृत माहिती अण्णांच्या कार्यालयाकडून देण्यात आहे आहे. अण्णा काल दिवसभर कार्यकर्त्यांच्या शिबिरात होते. त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू आहे. गेले दीड वर्ष कोरोना स्थितीमुळे अण्णांचे रूटीन चेकअप करण्यात आलेले नव्हते. काल डॉ. धनंजय पोटे व डॉ. हेमंत पालवे यांनी प्राथमिक तपासण्या केल्यानंतर वयानुरुप पुढील तपासण्या रुबी हॉलला करण्याची सूचना केली. त्यानुसार अण्णांना आज विविध तपासण्या करण्यासाठी रुबी हॉल, पुणे येथे आणण्यात आले आहे. झालेल्या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे डॉ. ग्रँट यांनी सांगितले आहे. कोणताही त्रास नसला तरी वयानूरूप प्रिकॉशन म्हणून डॉक्टरांनी एन्जिओग्राफी केली असून तेही रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.
विश्रांतीसाठी आजची रात्र अण्णा रुग्णालयातच थांबतील. सकाळी उर्वरीत तपासण्या करून अण्णा राळेगणला परततील. अण्णांच्या प्रकृतीविषयी कार्यकर्त्यांनी आजिबात काळजी करण्याचे कारण नाही, असं अण्णांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे.
अण्णा हजारे हे सध्या 84 वर्षांचे आहेत. त्यांनी आतापर्यंतचं आपलं संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वाहून घेतलं आहे. त्यांचा जन्म 15 जून 1937 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे झाला होता. अण्णा सुरुवातीला सैन्यात वाहनचालक होते. त्याचं खरं नाव किसन बाबुराव हजारे असं आहे. त्यांच्या आयुष्यावर आधारीत एक चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. त्यांनी केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 1990 साली पद्मश्री आणि 1992 साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं. त्यांनी सहकार चळवळीमध्ये राळेगणसिद्धी या गावाचा कायापालट केला. त्यांचे भ्रष्टाचार विरोधी केलेले आंदोलने प्रचंड गाजले आहेत. संपूर्ण देशाने त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.