पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा!

पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा!

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निर्मला पानसरे यांच्या तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची आज बिनविरोध निवड झाली.

  • Share this:

पुणे, 11 जानेवारी : राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकासआघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला धक्के पे धक्का दिला. पुण्यातही राष्ट्रवादीने आपला गड कायम राखत झेंडा फडकावला आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेड तालुक्यातील निर्मला पानसरे यांच्या तर उपाध्यक्षपदी भोर तालुक्यातील रणजित शिवतारे यांची आज बिनविरोध निवड झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचेच होणार हे निश्चित होतं. यावेळी अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने 18 महिला सदस्या इच्छुक होत्या. तर आता काही दिवसांनी इतर विषय समितींच्या सभापतींच्या निवडी केल्या जाणार आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षाकडून नावांची घोषणा केली होती, त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली.

अध्यक्षपदासाठी निर्मला पानसरे आणि उपाध्यक्षपदासाठी रणजीत शिवतरे या दोघांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वसाधारण सभेत या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं. मावळते अध्यक्ष विश्वास देवकाते खेडचे आमदार दिलीप मोहिते जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी निवडीनंतर नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवर महिला सदस्यांचा आक्षेप

दरम्यान, अजेंड्या नुसार जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर सुरू न करता थेट पाचव्या मजल्यावर सुरू करण्यात आल्याने विरोधी पक्षातील महिला सदस्य अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या. यामुळे वंचित राहिलेल्या सदस्यांनी आमची फसवणूक केल्याचा आरोप करत, निवड प्रक्रिया थांबली पाहिजे अशी मागणी महिला सदस्यांनी करत सभागृहाच्या बाहेर धरणे आंदोलन केलं.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्हाधिकारी प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराचा फटका विरोधी पक्षातील इच्छुक सदस्यांना बसला. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या निवडणूक परिपत्रकानुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया ही जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात होणार होती. अर्ज भरण्याची वेळ ही 11 ते 1 वाजेपर्यंत होती. यामुळे विरोधी पक्षातील इच्छुक सदस्या अर्ज भरण्यासाठी 11 वाजल्यापासून सभागृहाबाहेर बसल्या होत्या. जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, जयश्री पोकळे आदी महिला सदस्याचा यात समावेश होता. मात्र, एक वाजून गेल्यावरही सभागृहाचे दारही उघडण्यात आले नव्हते. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीकडून उमेदवाराची घोषणा केली आणि प्रशासनाकडून पाचव्या मजल्यावर निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. हे विरोधी सदस्यांना समजताच त्यांनी सभागृहाबाहेर आंदोलनाला सुरुवात केली. त्यांनी या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात ई-मेल आणि फोनद्वारे तक्रार केली. विरोधी सदस्यांना निवडणुकीपासून दूर ठवण्याचा डाव असल्याच्या आरोप त्यांनी केला. या विरोधात न्यायालयात जाण्याच्या इशारा आशा बुचके यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pune
First Published: Jan 11, 2020 04:50 PM IST

ताज्या बातम्या