दीपेश त्रिपाठी, मुंबई, 30 सप्टेंबर : लोकांकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी तरुणाने थेट खोट्या नोटा छापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बी फार्मचं शिक्षण घेतलेला दीपक घुंगे (वय 27) असं आरोपी तरुणाचं नाव आहे. दीपक घुंगे याने लोकांकडून कर्ज घेतले होते. मात्र ते त्याला परत फेडणे शक्य होत नव्हते. तसंच लॉकडाऊनमुळे कुठे नोकरी मिळणेही अवघड होते. त्यामुळे दीपक याने खोट्या नोटा बनवून आपलं कर्ज परत फेडण्याचा पर्याय निवडला आणि शेवटी तुरुंगात पोहोचला.
29 सप्टेंबर रोजी गुन्हे प्रकटीकरण कक्ष 3 चे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना खात्रीदायक सूत्रांकडून माहिती मिळाली की, एक इसम भारतीय चलनाच्या खोट्या नोटा घेऊन सीताराम मिल कंपाउंड लोअर परळ येथे वितरित करण्यासाठी येणार आहे. याबाबत माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेने क्षणाचाही विलंब न करता सापळा रचला आणि दीपक घुंगे याची वाट पाहू लागले.
दीपक घुंगे आला आणि गुन्हे प्रकटीकरण शाखा 3 च्या कर्मचाऱ्यांनी जो सापळा रचला होता त्यात तो फसला. दीपकला ताब्यात घेऊन जेव्हा त्याची झडती घेण्यात आली आणि त्याच्याकडे भारतीय चलनाचे शंभर रुपयांचे 896 नोटा म्हणजेच 89,600 रुपये पोलिसांनी जप्त केले. या नोटा खरे नसून दीपक घुंगेकडून युट्यूब वर व्हिडिओ पाहून बनवण्यात आल्या होत्या, हे स्पष्ट झालं.
दीपक घुंगेची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने नोटा बनवण्यासाठी पुण्याच्या दौंड येथे एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्या फ्लॅटची माहिती मिळताच पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकला आणि पोलिसांनी लॅपटॉप,लेझर स्कॅनर प्रिंटर, लॅमिनेटर, अर्धवट छपाई झालेल्या नोटांचे कागद, हिरव्या रंगाचे फाईल बंडल पेपर व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले.
हे काम सुरळीत झाले आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून आरोपीने फक्त शंभर रुपयांच्या नोटा छापल्या होत्या, जेणे करून कोणाला कधीच संशय येणार नाही. कारण जर दोन हजाराच्या किंवा पाचशेची नोट असेल तर लोक ती एकदा तपासून पाहतात. मात्र शंभरची नोट क्वचितच कोणी तपासतो.
दीपक घुंगे याने बीफार्मचं शिक्षण घेतलं असून तो सोलापूरचा रहिवाशी आहे. नकली नोटा छपाईमध्ये तो एकटाच होता की त्याच्यासोबत अजून कोणी सहभागी होतं, याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune crime, Pune police