पुणे, 29 एप्रिल : पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गामध्ये वाढ होत आहे. दरदिवशी रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. मात्र अशातच पुण्याच्या ससून रुग्णालयातून एक 'गुड न्यूज' आली आहे. ससून रुग्णालयातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूदरावरून टीका होत असताना याच ससूनमध्ये एका अवघ्या चार महिन्याच्या चिमुरड्याने कोरोनावर मात केली आहे.
आजोबांपासून लहान बाळाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या बाळाला उपचारासाठी ससूनमध्ये दाखल करण्यात आलं. कोरोना हा रोग तसं पाहिला गेलं तर ज्येष्ठ नागरिक आणि लहान बाळांसाठी सर्वाधिक घातक मानला जातो. मात्र ससूनच्या बालरोग विभागातील डॉक्टरांच्या प्रयत्नाना मोठं यश आलं आहे. कोरोनाला हरवून चार महिन्यांचा चिमुकला जीव सुखरूप बाहेर पडला आहे.
दरम्यान, आधी कोरोना झालेल्या एकूण 9 रुग्णांना काल ससूनमधून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये 9 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. आधीच कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या मृत्यूसंख्येमुळे बदनाम झालेलं ससून रुग्णालयाने आता मात्र चिमुकल्याला कोरोनापासून दूर करण्यात यश मिळवलं आहे.
दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासात तब्बल 122 कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. ही आजपर्यंतची सर्वाधिक मोठी वाढ आहे. त्यामुळे एकट्या पुणे शहरातील कोरोना रूग्णांची संख्या 1339 वर जाऊन पोहोचली आहे, तर जिल्ह्यात हीच आकडेवारी 1491 वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात आणखी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरातील मृतांचा आकडा 79 तर जिल्ह्यातली मृतांची संख्या 83 वर गेला आहे.
हेही वाचा-धक्कादायक! दारू समजून प्यायला सॅनिटायझर? साताऱ्यातील तिघांचा मृत्यूयाशिवाय विविध रुग्णालयांतून तब्बल 73 क्रिटिकल रुग्णंवर उपचार सुरू आहेत. यातही समाधानाची बाब म्हणजे तब्बल 27 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यात ससूनमधील एका 4 महिन्याच्या बाळाचा आणि 9 वर्षीय मुलीचाही समावेश आहे.
गर्भवती महिला रुग्णांसाठी विशेष सुविधा
पुण्यात गर्भवती महिला रुग्णांसाठी 2 कोव्हिड रुग्णालये राखीव ठेवण्यात येणार आहेत. पुणे महानगरपालिकेचे सोनवणे हॉस्पिटल आणि खासगी मीरा हॉस्पिटलमध्ये फक्त कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलांवर उपचार होणार आहेत. याबाबत पुणे मनपाच्या आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.