बेळगाव, 18 ऑगस्ट : कंटेनर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर सोमवारी दुपारी हा अपघात झाला. पुजेरीलाल यादव (55) आणि मिश्रीलाल वर्मा (25) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
बेळगावहून कोल्हापूरकडे निघालेल्या कंटेनरची आणि संकेश्वरहून निपाणीकडे येत असलेल्या दुचाकीची कणगला येथे समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेश येथील होते. मात्र रंगकामाच्या व्यवसायानिमित्त मागील 12 वर्षांपासून ते बेळगाव परिसरात वास्तव्यास होते.
गावी जाण्याच्या तयारीत असताना काळाचा घाला
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे बाहेरच्या राज्यातील अनेक कामगार महाराष्ट्रात अडकून पडले. पुजेरीलाल यादव आणि मिश्रीलाल वर्मा हे दोघेदेखील मार्च महिन्यापासून गावी गेलेच नव्हते. त्यामुळे सध्या हाती असलेलं रंगकाम संपवून गावी जाण्याचं त्या दोघांनी निश्चित केलं होतं. मात्र त्याआधीच अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, संकेश्वर पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगेनहळी आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी व पंचनामा केला. . घटनेची फिर्याद सतीशकुमार पुजरीलाल यादव यांनी दिली असून बाईकला धडक देणारा कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पुजारीलाल यादव यांच्या मागे पत्नी व तीन मुले आहेत. पत्नी दोन मुले उत्तर प्रदेशात वास्तव्यास आहेत. मिश्रीलाल वर्मा यांच्या मागे आई, वडील, पत्नी व मुलगा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.