कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दुकानबंदीनंतर आणखी एक महत्त्वाचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दुकानबंदीनंतर आणखी एक महत्त्वाचा निर्णय

पुण्यात याआधीच पुढचे 3 दिवस व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:

पुणे, 17 मार्च : कोरोनाचं संकट गडद होऊ नये यासाठी राज्यभरात वेगवान स्वरुपात उपाययोजना करण्यात येत आहे. पुण्यात पुढील तीन दिवस व्यापार बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता रेस्टॉरंट आणि बार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या तीन दिवसांसाठी हा निर्णय असणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजेस मालक संघटना आणि पुणे पोलीस यांच्यातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पुण्यात याआधीच पुढचे 3 दिवस व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किराणा, जीवनावश्यक वस्तू, दूध डेरीज, औषधं, भाजीपाला, फळं वगळता इतर दुकानं बंद राहणार असल्य़ाची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुण्यात संचारबंदी नसून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक एकावेळी गर्दी करून उभे राहू शकत नाही.

आजपासून पुण्यात या गोष्टींवर आहे बंदी

- तुळशीबाग पाठोपाठ सुप्रसिद्ध हॉंगकॉंग लेन शॉपिंग ही 3 दिवस बंद राहणार आहे.

- सावित्रीबाई फुले आणि पुणे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढं ढकलल्या

- ग्रामदैवत कसबा गणपतीचंही दर्शन बंद

- कोर्टाचे काम फक्त 11 ते 2 असं 3 तास चालणार

- येरवडा जेलमधून व्हिडिओद्वारे कैद्यांशी संपर्क करणार. कैद्यांना कोर्टात आणणार नाही

- 21 दिवस चाललेलं फुरसुंगी, उरुळी ग्रामस्थांचं कचरा विरोधी आंदोलन स्थगित

दरम्यान, देशात कोरोनाची लागण झालेले सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनामुळे भारतात मृतांची संख्याही तीन झाली आहे. आज मुंबईतही कोरोनाने पहिला बळी घेतला. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 39वर पोहोचली आहे. केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण करोना रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी महाराष्ट्रात लॉक डाऊन करण्याची वेळ येऊ शकते.

हेही वाचा-FACT CHECK - उकाडा वाढल्यानंतर महाभयंकर कोरोनाव्हायरसचा नाश होणार? काय सांगतात तज्ज्ञ

लॉक डाऊन केल्या काय होणार?

सध्या सरकारने मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांसोबतच व्यायामशाळा , स्विमिंग पूल) सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. मात्र लॉक डाऊन केल्यास नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे जाता येणार नाही. सध्या चीननंतर इटली आणि स्पेनमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ आपत्तीजनक परिस्थिती असल्याशिवाय लोकांना घराबाहेर पडता येणार नाही. लॉक डाऊनमध्ये केवळ अन्न आणि औषध खरेदी, रुग्णालय, बँक किंवा बालक आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी घर सोडण्याची मुभा असते.

First published: March 17, 2020, 3:56 PM IST

ताज्या बातम्या