पुणे: मन हेलावून टाकणारी घटना; कुत्र्याला वाचवण्यासाठी गेला आणि...

पुणे: मन हेलावून टाकणारी घटना; कुत्र्याला वाचवण्यासाठी गेला आणि...

मुसळधार पावसामुळे पुण्यातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत, टांगेवाला कॉलनीत भिंत कोसळून 5 जणांचा मृत्यू

  • Share this:

पुणे, 26 सप्टेंबर: पुण्यात बुधवारी मुसळधार पावसानं अक्षरश: थैमान घातलं होतं. अतिवृष्टीमुळे धरणं नाले तलाव पाणीपातळी सोडून वाहू लागल्यानं अनेक भागांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आणि अनेकांचे संसार वाहून गेले. या अतिवृष्टीत आतापर्यंत 11 जणांचे बळी गेले आहेत. मन हेलावून टाकणारी घटना घडली ती पुण्याच्या सहकारनगर परिसरातील अरण्येश्वर इथल्या टांगेवाला कॉलनीत.

रात्री मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली त्यामुळे नागरिकांनी आपला जीव मुठीत धरून घरं सोडली. अनेकांना संसार घरातील वस्तू जशाच्या तशा सोडून जीव वाचवण्यासाठी शेजारच्यांचा किंवा गच्चीचा आसरा घ्यावा लागला. 14 वर्षांचा रोहित आमले आपल्या मामाकडे राहात होता. त्याच्या घरात गुडघाभर पाणी आल्यानं त्यांनी घर सोडलं. मात्र रोहित घर सोडण्यास तयार नव्हता. घरच्यांनी त्याची समजूत काढून त्याला बाहेर आणलं. जीवापाड प्रेम असणाऱ्या कुत्र्याचं पिल्लू मात्र घरात साठलेल्या पाण्यात अडकून राहिलं. घरात असलेल्या कुत्र्याला काही होणार नाही ना? या विचारानं त्याचा जीव कासाविस झाला आणि त्याने मामाला सांगितलं. पाणीपातळी वाढायला लागल्यानं मामाने त्याला अडवलं. मात्र 'मी आलोच दोन मिनिटांत पटकन त्याला घेऊन', असं म्हणत त्याने हात सोडून पिल्लाला वाचवण्यासाठी घराच्या दिशेनं धाव घेतली. कुत्र्याला घराबाहेर घेऊन येत असताना दोघांवरही काळानं घाला घातला. मुसळधार पावसामुळे टांगेवाला कॉलनीतील भिंत कोसळली आणि त्यात 5 जणांचा मृत्यू झाला. भिंतीखाली आल्यामुळे रोहित आणि कुत्र्याचा मृत्यू झाला. 'कदाचित त्यावेळी रोहितने आमचं ऐकलं असतं तर रोहित आमच्या सोबत असता', अशी हळहळ त्याच्या मामांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे पुण्यातील मारुती देवकुळे यांनी मित्रमंडळ चौक इथे पाण्यात अडकलेल्या बाळाला वाचवलं आहे. मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात हे बाळ अडकलं होतं मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेनं वाचवून त्या बाळाला जीवदान दिलं आहे.

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुक्या जनावरांनाही बसला. पावसामुळं अनेक जनावरंही मृत्युमुखी पडली आहे. अरण्येश्वर भागात अनेक गाई रस्त्यावर मरून पडल्या आहेत. या परिसरात नागरिकांसह मुक्या प्राण्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. नागरिकांसमोर पुन्हा नव्यानं सगळं कसं उभं करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 12:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...