भारताने पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले केलेच नाहीत, मोदींनी दिशाभूल केली - शरद पवार

भारताने पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले केलेच नाहीत, मोदींनी दिशाभूल केली - शरद पवार

विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना पवारांनी हवाई हल्ल्यावर संशय व्यक्त करून नव्या राजकीय वादाला तोंड फोडलं आहे.

  • Share this:

मुंबई 9 जून : पुलवामाच्या हल्ल्यानंतर भारताने जे हवाई हल्ले केले ते पाकिस्तानमध्ये झालेच नव्हते असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. भारताने हे हल्ले पाकव्याप्त काश्मीरमध्येच केले होते आणि काश्मीरचा तो भाग हा भारताचाच भाग आहे असंही पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी Facebook Liveच्या माध्यमातून पवारांनी जो संवाद साधला त्यात त्यांनी हा गंभीर आरोप केला. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी लोकांची दिशाभूल केली. पाकिस्तानात घरात घुसून मारू असं ते सारखं म्हणायचे. त्यामुळे लोकांना त्याचं आकर्षण वाटलं होतं. पण भारताचे हवाई हल्ले हे काही पाकिस्तानात झाले नाहीत तर ते काश्मीरात झाले होते आणि तो भारताचाच भाग आहे. सामान्य लोकांना आंतरराष्ट्रीय सीमा आणि अनेक गोष्टींची फारशी माहिती नसते त्याचा फायदा मोदींनी घेतला अशी टीकाही त्यांनी केली.

पाकिस्तान विरुद्ध व्देषाची भावना निर्माण करून मोदींनी देशातलं वातावरण दुषीत केलं. त्याला सांप्रदायीक रंग देण्यात आला असा आरोपही त्यांनी केला.

14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात CRPFचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर 26 फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये हवाई हल्ले करत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ उद्धवस्त केला होता. त्यात 250 च्या आसपास अतिरेकी ठार झाले असा अंदाज व्यक्त केला जातोय.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा जोरदार वापर करत देश सुरक्षात हातांमध्ये आहे असा प्रचार केला होता. निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळालं तर विरोधीपक्षांचा धुव्वा उडाला होता. आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना पवारांनी असं विधान करून नव्या राजकीय वादाला तोंड फोडल्याचं म्हटलं जातेय.

First published: June 9, 2019, 7:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading