प्रवरा, 13 ऑक्टोबर : पद्यभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांनी शब्दबद्ध केलेलं 'देह वेचावा कारणी' या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आले आहे. यावेळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न पूर्ण करणे ही त्यांना श्रद्धांजली ठरेल', असं भाष्य केले आहे.
प्रवरानगरमध्ये 'देह वेचावा कारणी' आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब विखे पाटलांच्या आठवणींना उजाळा दिला.
'713 पानांचं आत्मचरित्र म्हणजे शेती,सहकार,चिंतन,राजकारण आणी मानवी मूल्य यांचा आरसा दाखवणारा हा ग्रंथ आहे. बाळासाहेब हे भेदभाव रहीत राजकारण करणारे राजकारणी होते. शेतीत सातत्यानं प्रयोग करून, शेतकऱ्यांना आधार देणारे लोकप्रतिनिधी होते. त्यांनी पहिली सर्वपक्षीय पाणीपरिषदही विखे यांनी भरवली होती. बाळासाहेब हे पश्चिमी वाहिन्यांचं पाणी वळवून, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या नियोजनाचे जनक आहे, असं फडणवीस म्हणाले.
तसंच, 'महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करणं हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, अशी भावना फडणवीसांनी व्यक्त केली.
तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, 'देह वेचावा कारणी हे आत्मचरित्र मी पूर्ण वाचलं. बाळासाहेब विखे पाटील हे शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक योजना आखणारे कर्मयोगी होते. शेतीमाल विपणन,दूध व्यवसाय,जिरायती शेतीवर प्रयोग,शिक्षणाबाबत आग्रही,आरोग्य जागरूकता अश्या अनेक गोष्टींवर बाळासाहेब आग्रही होते.'
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'प्रवरानगर, छत्रपती शिवाजी महाराज तसंच वीर विरांगणा कर्मयोग्यांच्या भूमीला मी वंदन करतो' असं मराठीतून म्हणत भाषणाला सुरुवात करत उपस्थिती मान्यवरांची मन जिंकली.
'बाळासाहेब विखे पाटलांचा प्रत्येक राजकीय पक्षांशी संबंध होता. त्यामुळेच बाळासाहेब पाटील यांच्या आयुष्यावर असलेले पुस्तक हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. गाव, गरीब आणि शेतकऱ्यांना विखे यांनी जवळून पाहिले. त्यांनी शेतकऱ्यांना जवळ आणले आणि सहकार क्षेत्राशी जोडले. सहकारी चळवळ ही खरी निधर्मी चळवळ आहे. ती कुठल्याच जातीची आणि कुठल्या ही धर्माची नाही. आतापर्यंत सर्व जाती आणि धर्मांना स्थान दिले आहे' असंही मोदी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.