बारामती, 3 ऑगस्ट : राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष आणि सध्या भाजपात असणारे पृथ्वीराज जाचक यांनी आज मुंबई येथे सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे छत्रपती कारखान्याच्या सभासदांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना जाचक अध्यक्ष असताना त्यांनी उत्कृष्ट पध्दतीने चालवल्याचं बोललं जातं. परंतु नंतर जाचक यांना अध्यक्ष पदावरून पाय उतार केल्यानंतर त्यांनी पवार यांच्याविरोधात कारखान्याचे पॅनेल उभे केले होते. यात जाचक यांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला होता.
त्यानंतर छत्रपती सहकारी साखर कारखान्याने कारखान्यात बदल केले. कारखाना ऊसाचे गाळप करण्यात मागे पडला. परिणामी छत्रपतीच्या सभासदांनी शेजारच्या कारखान्यास आपला ऊस घातला. नंतरच्या मंडळींना कारखाना व्यवस्थित चालवता न आल्याने कारखान्यावर आता कर्ज आहे, असा आरोप करण्यात येतो. शिवाय कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे.
त्यामुळे आज जाचक आणि पवार यांच्या समवेत जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या भेटीमुळे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा पदभार पुन्हा जाचक यांच्याकडे जाणार का? अशी देखील चर्चा सभासदांमध्ये रंगू लागली आहे. मात्र पवार यांच्या आजच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.