नवी दिल्ली, 26 मार्च : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी त्या प्रचार करण्याची शक्यता आहे. सध्या प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रीत केलं असून तिथं त्यांचे दौरे सुरू आहेत. त्यांनी राज्यातही सभा घ्यावी अशी काँग्रेस नेत्यांची मागणी होती. त्यामुळे त्या आता महाराष्ट्रात प्रचार करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्यामुळे आता काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादीदेखील जाहीर करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांमधे राहूल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधींसह क्रिकेटर मोहम्मद अझररूद्दीन आणि काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांचा समावेश आहे.
राधाकृष्ण विखे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मिलींद देवरा, संजय निरूपम, भाई जगताप, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक यांसह अनेकजण काँग्रेस स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. त्यामुळे आता हे स्टार प्रचारक काँग्रेसला 2019मध्ये तारणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
शिवभक्तीनंतर आता रामभक्ती, काशीयात्रेनंतर आता अयोध्यावारी!
काँग्रेसच्या सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 29 तारखेपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यात प्रियंका अयोध्या, अमेठी, रायबरेली आणि बाराबंकीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
प्रियंका यांच्या दौऱ्याच्या आधी अयोध्येत त्यांचे पोस्टर्स लागले आहेत. त्यावर राहुल गांधीही आहेत. त्यात प्रियंकांना रामभक्त दाखवण्यात आलं आहे. पण प्रियंकांची ही अयोध्या यात्रा भाजपला रुचलेली नाही. त्यांच्या अयोध्या दौऱ्याची भाजप राजकीय पर्यटन म्हणून संभावना करतं आहे.
गुजरात निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधींच्या मंदिर दर्शनाला वेग आला होता. सोमनाथचा वाद झाल्यानंतर राहुल गांधी जानवं घालणारे हिंदू असल्याची घोषणा करून काँग्रेसनं हिंदुत्व अधोरेखित करण्याचा आटापिटा केला होता. मध्यप्रदेश, राजस्थानातही मंदिरांना भेट देण्यात राहुल गांधींनी कोणतीच कसर सोडलेली नाही.
आता 2019 च्या निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा मागे पडला असला तरी हिंदू मतं आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसला रामाचा धावा महत्त्वाचा वाटतो आहे. हिंदुत्वाचा हा जागर काँग्रेसला भाजपसारखेच अच्छे दिन आणणार का, याचा फैसला काळच करेल.
VIDEO: वहिनींशी पंगा घेऊ नका, तिच्याजवळ चार खासदार आहेत - सुप्रिया सुळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.