'चर्चा झाली, पण जाहीरपणे सांगणार नाही' : काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात

'चर्चा झाली, पण जाहीरपणे सांगणार नाही' : काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात

राज्यात सत्तास्थापनेचा पेचप्रसंग निवडणूक निकालानंतर 14 दिवसांनंतरही कायम आहे. आता काँग्रेस- राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष आहे. पण काँग्रेसच्या हालचालींविषयी विचारलं असता पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले वाचा..

  • Share this:

मुंबई, 7 नोव्हेंबर : राज्यात सत्तास्थापनेचा पेचप्रसंग निवडणूक निकालानंतर 14 दिवसांनंतरही कायम आहे. गुरुवारी सकाळपासून राजकीय हालचालींना वेग आला होता. पण शिवसेना आमदारांच्या मातोश्रीवरच्या बैठकीनंतर सेना कुठल्याही तोडग्यापर्यंत आलेली नाही आणि दुसरीकडे भाजप नेते राज्यपालांना भेटले असले तर या पक्षाकडूनही सत्तास्थापनेचा दावा अद्याप झालेला नाही. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. काँग्रेस नेते आणि नवनिर्वाचित आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना याविषयी विचारले असता, चर्चा सुरू आहेत, असं उत्तर दिलं पण जाहीरपणे सांगण्यास नकार दिला. काँग्रेसची भूमिका सध्या तर वेट अँड वॉचची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काल भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज व्यक्त केली होती. त्याविषयी विचारलं असता ती काँग्रेसची भूमिका नसून अशोक चव्हाणांचं मत आहे, असं पृथ्वीराज यांनी स्पष्ट केलं. "आमची मतं काय आहेत ते आम्ही आमच्या पक्षाध्यक्षांच्या कानावर घातलं आहे", असं ते म्हणाले. सत्तास्थापनेविषयी आणि राज्याच्या परिस्थितीविषयी राष्ट्रवादीशी चर्चा सुरू आहे का असं विचारलं असता ते म्हणाले, "चर्चा झाली, पण जाहीरपणे सांगणार नाही. युतीकडे बहुमत आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट पाहात आहोत.

शिवसेना सत्तास्थापन करणार का, त्यांना आमदारांचा पाठिंबा कसा मिळेल, यावर ते शिवसेनेला विचारा, असं उत्तर पृथ्वीराज यांनी दिलं. आमचा एकही आमदार फुटणार नाही, असंही ते म्हणाले.

संबंधित - शिल्लक फक्त 48 तास; सत्ता स्थापनेच्या या आहेत 9 शक्यता!

राज्यात सध्या सत्तास्थापनेहूनही प्रचंड मोठं संकट आलं आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं आहे. अशा परिस्थितीत काळजीवाहू सरकार काही महत्त्वाची पावलं उचलत नाही. त्यामुळे राज्यपालांनी राजकीय सूत्र हाती घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी आम्ही राज्यपालांना भेटतो."

वाचा - 'भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही', वाचा पत्रकार परिषदेतल्या 15 मुद्दे

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर अजूनही ठाम आहेत. 'मला स्वतःहून युती तोडायची नाही. भाजपने काय तो निर्णय घ्यावा.युती कायम राहावी हीच इच्छा आहे. मात्र भाजपनं दिलेला शब्द पाळावा. ठरल्याप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे देणार असाल तरच भाजपने फोन करावा,' अशी भूमिका या बैठकीत उद्धव ठाकरेंनी घेतल्याची माहिती आहे.

वाचा - हायव्होल्टेज बैठकीत अखेर शिवसेना आमदारांचं ठरलं, मुख्यमंत्रिपदाबाबत एकमत!

दुसरीकडे भाजप नेते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले, पण त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला नाही. "भाजप अल्पमतातलं सरकार बनवणार नाही. आम्हाला महायुतीचं सरकार आणण्याची इच्छा आहे. आज आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही", असं मुनगंटीवार यांनी राज्यपालांना भेटल्यानंतर पत्रकारांना सांगितलं.

-------------

संजय राऊतांचं फडणवीसांना चॅलेंज, भाजपवर केला आरोप ; UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 04:50 PM IST

ताज्या बातम्या