रायगड, 2 एप्रिल : छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा आपल्या सुवर्ण इतिहासाची साक्ष देणारा आहे. आपल्या इतिहासाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी अनेक वर्षांपासून या किल्ल्यावर पुरातत्व विभागामार्फत उत्खनन केले जात आहे. याच उत्खननादरम्यान दोन दिवसांपूर्वी मौल्यवान अशी एक बांगडी मिळाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत माहिती दिली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच पत्रकार परिषद घेऊन आनंद व्यक्त केलाय. गडावर आतापर्यंत झालेल्या उत्खननामध्ये भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं अशा वस्तू मिळालेल्या आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याच्या धातू पासून बनवलेली पुरातन मौल्यवान बांगडी मिळालेली आहे. अशाप्रकारे पुढेही अनेक ऐतिहासिक वस्तूंसह वेगवेगळे अलंकारही उत्खननात मिळू शकतात. यामुळे गडावरील तत्कालीन राहणीमान, संस्कृती, वास्तूरचना नव्याने समजण्यास मदत होणार असल्याचं सांगत संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याच्या कामाचं कौतुक केलं आहे.
प्रथमच अशा प्रकारे स्त्रियांचा अलंकार उत्खननात सापडला असल्याचं संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गड किल्ले हीदेखिल आपली अमूल्य अशी संपत्ती आहे, त्याचे जतन आणि संवर्धन करणेही तेवढेच गरजेचे असल्याचे संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raigad