पालघर, 23 जून : सफाळे गावातील पश्चिमेला असणाऱ्या सुमारे साडेचार ते पाच हजार एकर क्षेत्रात पसरलेल्या साडे तीनशे कोलंबी प्रकल्पांमध्ये चोरी आणि लुटमारीचे प्रकार वाढत चालत असल्याची बाब समोर आली आहे. सध्या लहान व मध्य्म आकाराच्या तळ्यामधून लाखो रूपयांची चोरी करण्याचे प्रकार दिवसा ढवळ्या घडत आहे. त्यामुळे प्रकल्प मालकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
सफाळ्याच्या पश्चिम भागात दातिवरे ते जलसार दरम्यान असलेल्या वेढी, टेम्भिखोडावे, डोंगर, खार्डी, विळंगी त्याचप्रमाणे केळवे- माहीम परिसरात तीनशे ते साडेतीनशे लहान मोठे कोलंबी प्रकल्प आहेत. हे प्रकल्प खाडी व समुद्र किनाऱ्या लागत खाजण व दुर्गम भागात असल्याने तसेच मोठ्या क्षेत्रफळावर विस्तारित असल्याने अशा प्रकल्पांमधून रात्रीच्या वेळी चोरी होत असते.
कोलंबी प्रकल्पावर असलेल्या सुरक्षारक्षकांची नजर चुकवून एखाद्या कोलंबी तळ्यातील कोपऱ्यात खाद्यपदार्थ टाकून कोलंबी ना एकत्रित कोपर्यात आणले जाते. नंतर लहान जाळ्याच्या माध्यमातून कोलंबी वेचल्या जातात.
लॉकडाउनच्या काळात या चोऱ्यांच्या प्रकारामंध्ये वाढ झाल्याचे प्रकल्प मालकांचे म्हणणे आहे. खाडी मार्गातून बोटी घेऊन ही मंडळी नियोजित पद्धतीने व तयारीने येतात. कोलंबी नाशवंत असल्याने चोरलेल्या साठविण्यासाठी बर्फ देखील सोबत घेऊन येतात. 10 ते 15 जणांच्या टोळीमध्ये येणारी ही स्थानिक मंडळी काही प्रसंगी शस्त्र देखील सोबत ठेवतात, जेव्हा यांना विरोध केला तर ते आमच्यावरच दगडफेक करतात, असं प्रकल्प मालकाने सांगितले.