मुंबई 05 फेब्रुवारी : मातोश्री हे महाराष्ट्रातलं महत्त्वाचं शक्तिकेंद्र. मातोश्रीने देशभरातल्या अनेक नेत्यांचं आदरातिथ्य केलं आहे. मात्र मंगळवारी आलेल्या एका खास पाहुण्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. काळा शर्ट आणि जिन्सची पँट अशा कॅज्युअल वेषात आलेला हा पाहुणा होता प्रशांत किशोर. प्रशांत किशोर हे मातोश्रीवर आले आणि महाराष्ट्रात नव्या राजकीय चर्चेला उधाण आलं. पण त्याचा खुलासा आता झाला आहे.
प्रशांत किशोर हे लोकसभेसाठी शिवसेनेची रणनीती ठरविणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र प्रशांत किशोर यांच्या ट्विट नंतर त्याचा खुलासा झाला आहे. युतीची बोलणी पुढे नेण्यासाठी किशोर हे मातोश्रीवर गेले हे स्पष्ट आता स्पष्ट झालं. त्यामुळे युतीच्या चर्चेची गाडी वेगात येईल असे स्पष्ट संकेत आहेत.
किशोर यांनी मातोश्री भेटीत उद्धव ठाकरे आणि आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आणि नंतर दुपारचं जेवणही घेतलं. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एक फोटो ट्विट करून म्हटलं की मी आणि उद्धवजींनी आज एका खास पाहुण्यांसोबत जेवण घेतलं आणि अतिशय उत्तम अशी आमची चर्चा केली.
याला प्रशांत किशोर यांनी ट्विट करून उत्तर दिलं. प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्विटमध्ये आदरातिथ्याबद्दल उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे आभार मानले. एनडीएचा घटकपक्ष या नात्याने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत इतरही समविचारी पक्षांना सोबत घेऊन आपण लोकसभेच्या निवडणुकीचा विजय पक्का करू आणि त्यानंतरही चांगलं काम करू असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
त्यामुळे प्रशांत किशोर यांची मातोश्री भेट ही युतीसाठीच होती हे स्पष्ट झालंय. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी करण्यात आणि जागावाटप करण्यात प्रशांत किशोर यांची महत्त्वाची भूमिका होती. काही दिवसांपूर्वीच नितीश कुमार यांनी अमित शहांच्या सांगण्यावरूनच प्रशांत किशोर यांना जेडीयूमध्ये घेतल्याचं सांगितलं होतं.
त्याचबरोबर किशोर हे आता जेडीयूमध्ये पदाधिकारी आहेत. त्यामुळे ते थेटपणे शिवसेनेच्या प्रचाराच्या कामाची बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर येण्याची शक्यता कमीच होती. त्यामुळे अमित शहांचा खास निरोप घेऊन प्रशांत किशोर हे मातोश्रीवर आले होते. त्यामुळे किशोर हे आता महाराष्ट्रातल्या युतीचे शिल्परकार ठरणार का याची चर्चा सुरू झालीय.
VIDEO : उपोषणासह अण्णांना संपवण्याचा सरकारचा डाव - संजय राऊत