नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) स्थापनेला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. पण या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अनेक नेत्यांवर निशाणा साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री (Accidental CM) आहेत. त्यांनी गद्दारी करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधी लोकांशी हातमिळवणी केली, असा घणाघात जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. "राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाले. केंद्राने केलेली कामेही त्यांनी आपल्या खात्यात मांडली. हे संधीसाधू सरकार आहे. या सरकारला मी नवे नाव देतोय. हे महा विश्वासघातकी आघाडी सरकार आहे", अशी टीका प्रकाश जावडेकर यांनी केली.
"या दोन वर्षात अनेक मंत्र्यांचे कारनामे बाहेर आले. काही मंत्र्यांनी जावयाला कॉक्ट्रॅक्ट दिलं. काही मंत्र्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित मालमत्ता घेतली. राज्यात भ्रष्टाचार आहे. कायदा व सुव्यवस्था नाहीय. माजी गृहमंत्री सहा महिने फरार होते. नंतर ते जेलमध्ये गेले, असं कोणतं राज्य आहे?", असा सवाल जावडेकरांनी केला. तसेच मुंबई पोलीस आयुक्त गायब होणं, हेही वाईट आहे, असंदेखील ते यावेळी म्हणाले.
"महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. हे असं सरकार आहे ज्याने महाराष्ट्राला लुटलं आणि मतदारांची फसवणूक केली. त्यामुळे हे सरकार फक्त महावसुली आघाडी नाही तर महा विश्वासघातकी आघाडी आहे. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी हे या सरकारचं वैशिष्ट्य आहे. अनेक मंत्री, आमदारांनी भ्रष्टाचार केला. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचे 1000 कोटींच्या बेनामी संपत्तीसोबत असलेले कनेक्शन समोर आले. तर दुसऱ्या एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला सर्वसामान्याचा छळ केल्याबद्दल अटक करण्यात आली. तर तिसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्याकडून जमीन खरेदी केली आहे. तर चौथ्या एका मंत्र्यांवर जावायालाच किफायतेशीर दरात कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा आरोप आहे", असा दावा जावडेकरांनी केला आहे.
हेही वाचा : 'तुम्ही आमची भावकी निवडून दिलीय, निधीत कमी पडू देणार नाही', अजित पवारांचं आश्वासन
"मुख्यमंत्री खूप कमीवेळा मंत्रालयात आपल्या कार्यालयाला भेट देतात. महाराष्ट्रातील जनता पहिल्यांदाच अपघाती मुख्यमंत्र्यांचा अनुभव घेत आहे. मुख्यमंत्र्यांवर निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या उत्पन्न आणि मालमत्तेबाबतची माहिती जाहीर न केल्याचा आरोप आहे. तर त्यांच्या सचिवांनी CRZ नियमांचं उल्लंघन करुन बंगला बांधला होता. याबाबत कारवाई होणार तेव्हा त्यांनी स्वत: तो बंगला जमीनदोस्त केला. तसेच शिवसेनेच्या एका खासदाराला पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणी ईडीची नोटीस गेली होती. त्या नोटीसीनंतर त्यांनी सर्व कर्जफेड केलं", असं प्रकाश जावडेकर म्हणाले.
MVA govt. in Maharashtra is completing 2 years today. It is a govt. which has looted & betrayed the voters. So it is not only 'Maha Vasuli Aghadi' but also a 'Maha Vishwasghati Aghadi'. Sharing the Press note of my today's press conference. #MVA @BJP4Maharashtra @PIBMumbai pic.twitter.com/gTB7x9Et9o
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) November 28, 2021
हेही वाचा : 'सौ दर्द छुपे है सिने में, मगर अलग मजा है जिने में', छगन भुजबळांचं शेरोशायरीतून विरोधकांना उत्तर
"राज्य सरकारने इंधन दराबाबत टॅक्स कमी न करता विदेशी दारुमध्ये सूट दिली. यांच्या काळात रझा अकादमीला राजाश्रय मिळाला. राज्य सरकारने ओबीसी, मराठा आरक्षणबाबत काहीच केलं नाही. तसेच महाराष्ट्रात हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. आता जनताच या सरकारला बाजूला करेल", असा देखील घणाघात जावडेकरांनी पत्रकार परिषदेत केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.