अकोला, 11 मार्च : मी सोलापूर लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला इथं पत्रकार परिषदेत केली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या घोषणेनं काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.
प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत सामावून घेण्याबाबत काँग्रेस अजूनही सकारात्मक असल्याचं बोललं जात होतं. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांनी मात्र 'एकला चलो रे' चा नारा दिल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे.
सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणीत वाढ
सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला. पण मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे शरद बनसोडे हे जाएंट किलर ठरले. आधीच भाजपचं आव्हान आणि त्यात आता प्रकाश आंबेडकर यांची एंट्री यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या मतदारसंघात मराठा, धनगर समाजाप्रमाणेच मुस्लीम आणि दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघात चांगली कामगिरी करू शकते, असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.
आंबेडकरांची 22 जागांची मागणी
लोकसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे 22 जागांची मागणी केली होती. नांदेड, बारामती आणि माढा या जागांची मागणी काँग्रेस-राष्ट्रावादीकडे करण्यात आली आहे. यात माढामधून शरद पवार तर बारामतीतून सुप्रिया सुळे या उभ्या राहणार आहेत.
VIDEO : भाजपवरील जहरी टीकेनंतर गिरीश महाजनांनी दिलं राज ठाकरेंना आव्हान