'आघाडी'चा चेंडू काँग्रेसने टोलवला आंबेडकरांच्या कोर्टात

'आघाडी'चा चेंडू काँग्रेसने टोलवला आंबेडकरांच्या कोर्टात

चुका टाळून विधानसभेसाठी आघाडीसाठी पुढे गेलं पाहिजे असं काँग्रेसमधल्या एका गटाचं मत आहे. तर दबावाला बळी पडू नये असं काही नेत्यांना वाटतंय.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई 14 जून : वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभेत काँग्रेसला जोरदार फटका बसला हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय करायचं यावर काँग्रेसमध्ये खलबतं सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस वंचितसोबत जाण्यास तयार आहे मात्र त्यासाठी पुढाकार प्रकाश आंबेडकरांनी घ्यावा असं काँग्रेसचं मत आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीय. काँग्रेसच्या नेत्यांची आज विधानसभा तयारीबाबात बैठक झाली त्याच हे मत व्यक्त झाल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने तयारी दाखवली होती. मात्र प्रकाश आंबेडकरांना आघाडी करण्याची इच्छा नव्हती असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर काँग्रेसच्या अटींवर आघाडी होणार नाही असं आंबेडकरांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे झालेल्या चुका टाळून विधानसभेसाठी आघाडीसाठी पुढे गेलं पाहिजे असं काँग्रेसमधल्या एका गटाचं मत आहे. तर दबावाला बळी पडू नये असं काही नेत्यांना वाटतंय. त्यामुळे काँग्रेसचे आघाडी करण्याबाबतचा चेंडू वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या कोर्टात टोलवला आहे. आंबेडकर त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काँग्रेस नेत्यांच्या बैठकांना आमदारांची पाठ

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केलीय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व सूत्रं आपल्या हाती घेत झाडाझडतीला सुरुवात केलीय. काँग्रेसच्या नेत्यांनीही बैठका घ्यायला सुरुवात केलीय मात्र या बैठकींना आमदारांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. बैठकांना आमदारच येत नसल्याने काँग्रेसच्या बड्या नेत्यांची चिंता वाढली आहे. या आमदारांना एकत्र कसं ठेवायचं असा पेच या नेत्यांना पडलाय.

लोकसभेतल्या पराभवाने खचलेल्या काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळलाय. प्रदेशाध्यक्ष आणि पक्षप्रभारी या दोनही नेत्यांचा पराभव झाल्याने सर्वच पक्षात आलबेल आहे. कोणी कोणाला जाब विचारायचा असा प्रश्न निर्माण झालाय. मात्र यातून सावरण्याचा प्रयत्न करण्यासाठी वरिष्ठ नेते बैठका घेतायत तर त्यांच्याकडे आमदारच फिरकत नसल्याचं उघड झालंय.

महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे,  प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यासह दिग्गज नेते गेली दोन दिवस बैठका घेत आहेत. मात्र या बैठकांना महत्त्वाच्या आमदारांनीच पाठ फिरवलीय. वैयक्तिक कारणं देत अनेक आमदार या बैठकांना गैरहजर राहिले आहेत. या नेत्यांमध्ये विश्वजित कदम, सतेज पाटील, भारत भालके, संजय निरूपम सारख्या नेत्यांचा समावेश आहे.

First published: June 14, 2019, 9:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading