Home /News /maharashtra /

'दंगल घडवण्याचा डाव आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बसून उधळला'

'दंगल घडवण्याचा डाव आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बसून उधळला'

सध्याही राज्यात सत्तांतर झाले असून त्याचा फायदा घेऊन कोरेगाव भीमा इथं दंगल घडवण्याचा डाव होता असा खळबळजनक खुलासा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

    पुणे, 01 जानेवारी : कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी विजय स्तंभाला अभिवादन केलं. त्यानतंर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठवाडा विद्यापीठ नामांतरावेळी राजकीय परिस्थिती बदलल्याने लोकांनी राजकीय दंगल घडवली. सध्याही राज्यात सत्तांतर झाले असून त्याचा फायदा घेऊन कोरेगाव भीमा इथं दंगल घडवण्याचा डाव होता. हा डाव आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बसून उधळून लावल्याचा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की,'राज्यात सत्तांतर झाल्याने त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही लोकांकडून दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न होता. हा डाव आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बसून उधळून लावला.' विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. अजित पवार यांनी अफवावंर विश्वास ठेवू नका, शांतता राखा असं आवाहन केलं. राज्याचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी भीमा कोरेगाव येथे जाऊन विजयस्‍तंभाला मानवंदना दिली. नववर्षात सरकार महिलांची सुरक्षितता, रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशिल असेल, असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. मंत्री नितिन राऊत आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील भीमा कोरेगाव येथे पोहोचणार आहेत. हा सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलीस आणि प्रशासनाने कडेकोट नियोजन केलं आहे. सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. लोणीकंद शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरवर्षी होणाऱ्या या सोहळ्यामध्ये 2018 सारखा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. 740 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर आहे. सोशल मीडियावरून जातीय भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. यासाठी 250 हून अधिक व्हॉटसअॅप ग्रुपच्या अॅडमिनला याआधीच नोटिस बजावण्यात आली आहे.
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Ajit pawar, Prakash ambedkar

    पुढील बातम्या