सरकारला हवे तसे सल्लागार मिळाले नाहीत, प्रकाश आंबेडकरांची जळजळीत टीका

सरकारला हवे तसे सल्लागार मिळाले नाहीत, प्रकाश आंबेडकरांची जळजळीत टीका

आंदोलन न करता चर्चा करावी, यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. मात्र आपण आंदोलनावर ठाम...

  • Share this:

पंढरपूर, 31 ऑगस्ट: कोरोनामुळे लोकांचे धर्मस्वातंत्र्य हिरावले जात आहे. लोकशाही टिकावी यासाठी, आमचं आंदोलन असल्याचं सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारला हवे तसे सल्लागार मिळाले नाहीत, अशी जळजळीत टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

आंदोलन न करता चर्चा करावी, यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. मात्र आपण आंदोलनावर ठाम असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा...'ज्या नेत्यांचा श्वास मंदिरात घुसमटतो व नाइट लाइफमुळे फुलतो ते...'; भाजप आक्रमक

प्रकाश आंबेडकर पंढरपूर येथील विश्रामगृहात दाखल झाले आहेत. त्यांनी सांगितलं की, मंदिरावरही अर्थव्यवस्था अवलंबून आहेत. त्यामुळे सरकारनं भाविकांचा फार अंत बघू नये. आम्ही मंदिराच्या दरवाज्यापर्यंत तरी जाऊ, असाही इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

आमचे आंदोलन शांततेने असल्याने पोलिसांना आम्हाला सहकार्य करावेच लागेल. एकीकडे सरकार हॉस्पिटल, बाजारपेठ, एसटी सेवा सुरु करत आहे. मग मंदिरं उघडण्यास काय अडचण आहे. आता कोरोनाचा प्रभाव जानेवारी, फेब्रुवारीसारखा राहिला नाही. केंद्रानं उद्योजकांना 2 लाख कोटींची मदत केली आहे. राज्य शासनानं आलुतेदार, बलुतेदारांकडे लक्ष द्यावे, त्यांना दीर्घकाळासाठी प्रत्येकी किमान 25 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

दरम्यान, पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणीचं मंदिर भाविकांसाठी खुले करावे, या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात विश्व वारकरी सेना, बहुजन वंचित आघाडीकडून रविवारी आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त आहे.

पंढरपूरला छावणीचं स्वरुप...

वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेनेच्या आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबदारीचा उपाय म्हणून शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंढरपूर शहराला छावणीचं स्वरूप आलं आहे. शहरात 50 पोलीस अधिकारी आणि एकूण 400 पोलीस बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. आंदोलक शहरात येऊ नये यासाठी शहराला जोडणाऱ्या प्रमुख सात रस्त्यावरून तिहेरी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसंच मंदिर परिसरातील छोठेमोठे 30 रस्ते देखील बंद करण्यात आल्याची माहिती सोलापूरचे अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.

हेही वाचा... धक्कादायक घटना! महिलेनं व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून तरुणाचा शूट केला Nude Video

राज्यात दारू, गुटख्याची दुकानं चालू असताना विठ्ठल मंदिर बंद का? असा सवाल विश्व वारकरी सेनेचे संस्थापक ह.भ.प.अरुण महाराज बुरघाटे व ह.भ.प. शेट्ये महाराज यांनी सरकारला केला आहे. सरकार प्रतिसाद देत नसल्यानं 31 ऑगस्टला मोठ्या संख्येने पंढरपूरला येण्याचं आवाहन वारकरी बांधवांना करण्यात आलं आहे.

दुसरीकडे, पंढरपूरात आज दिवसभर एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. पंढरपूर आगारातून एकही एसटी बस बाहेरगावी जाणार नाही. वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 31, 2020, 12:20 PM IST

ताज्या बातम्या