अकोला, 27 जुलै : लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'आमचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, फक्त आम्हाला लॉकडाऊन मोडावं लागेल,' असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
गुन्हे दाखल होण्याची भीती मला दाखवायची नाही, माझी जेलमध्ये जाऊन राहायची तयारी आहे. मी स्वतः कोविडची टेस्ट करून घेतली आहे, महाराष्ट्राचे 'मुख्यमंत्री यांना माझी मागणी आहे की, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व लोक प्रतिनिधींची कोविड टेस्ट करून घ्यावी. ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे त्यांना शासनाने क्वारन्टाइन करावं, ज्यांची निगेटिव्ह आली त्यांना फिरायला रान मोकळं करावं,' असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊनवर याआधीही प्रकाश आंबेडकरांनी केली टीका
'सुरुवातील कोरोना व्हायरसने सर्वांनाच भीती घातली. अमेरिकेच्या हाफकिनी संस्थेनं भारतात 40 टक्के लोकांना कोरोना होईल असं सांगितलं होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी भारतात जास्त कोरोनाचा प्रसार होणार नाही, भारतीय लोकांनी रोग प्रतिकार शक्ती ही चांगली आहे. असं म्हटलं आहे. त्यामुळे लोकं आता लॉकडाउनमध्ये उपाशीपोटी मरतील', अशी भीती प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी बोलताना व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊन वाढीवरून सरकारवर निशाणा साधला आहे.