शिवसेनेची शेवटच्या क्षणी कोंडी, आघाडीच्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

शिवसेनेची शेवटच्या क्षणी कोंडी, आघाडीच्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

सेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करता येणं शक्य नाही. यातच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या एका वक्तव्याने शिवसेना कोंडीत सापडली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : भाजपने सत्ता स्थापनेसाठी दावा करणार नसल्याचं सांगितल्यानंतर शिवसेनेला राज्यपालांनी आमंत्रण दिलं आहे. त्यासाठी सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. सेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करता येणं शक्य नाही. यातच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या एका वक्तव्याने शिवसेना कोंडीत सापडली आहे.

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं अजुन काही ठरलेलं नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं. याबाबतचा निर्णय कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आघाडीचे नेते एकत्र मिळून घेतील असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं. तसंच पाठिंबा देण्याबाबात शिवसेनेला कोणत्याही प्रकारची अट नव्हती असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला दावा करण्यास राज्यपालांनी बोलावलं आहे. भाजपने सत्ता स्थापनेस असमर्थ असल्याचं जाहीर केल्यानंतर आता राज्यात नवीन राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चार पक्षांच्या बैठकींचे सत्र सुरु झाले आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीशिवाय राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्याही कोअर कमिटीची बैठक होणार आहे. तर सत्ता स्थापनेला असमर्थता दर्शवणाऱ्या भाजपनेदेखील पुन्हा एकदा बैठक बोलावली आहे.

निव़डणुकीच्या निकालानंतर राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला. सेनेसोबत युती करून निवडणुका लढलेल्या भाजपला निकालानंतर मात्र सहकारी पक्षाने साथ दिली नाही. दोन्ही पक्षातील तणाव वाढल्यानंतर राज्यपालांनी दिलेल्या आमंत्रणानंतर भाजपने सरकार स्थापन करू शकत नसल्याचं स्पष्ट केलं. आता भाजपने पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावर कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे.

भाजपनंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. सेनेसमोर 145 आमदारांचे संख्याबळ दाखवण्याचे आव्हान असणार आहे. राज्यपालांची भेट घेण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदारांसोबत बैठक घेणार आहे. दरम्यान, शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा देणार असल्याचं सांगितलं आहे. राष्ट्रवादीकडून राज्यात पाठिंबा मिळवायचा असेल तर एनडीएतून बाहेर पडावं लागेल अशी चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा दिल्याने आता राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेना सरकार स्थापन करणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे.

सध्या राज्यातील संपूर्ण राजकीय परिस्थिती राष्ट्रवादीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. जर केंद्रात एनडीएतून बाहेर पडल्यास सेनेसोबत सरकार स्थापनेचा विचार करू अशी अट राष्ट्रवादीने ठेवली होती. आता सेनेकडून एकमेव मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काय करणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक होणार आहे.

भाजप सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विरोधी पक्षांची भूमिका काय असेल यावर पुढच्या घडामोडी ठरणार आहेत. शिवसेना-राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर त्यात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असेल. महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांनी पाठिंब्याबाबत सकारात्मक मत व्यक्त केलं आहे. सध्या तरी काँग्रेसचा पाठिंब्याबद्दलचा निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे. याबाबात दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक आहे. यावर महाराष्ट्रात चर्चा होऊ शकते.

वाचा : सत्ता स्थापनेचा पेच आणखीन वाढला; सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र

वाचा : भाजपला आता 'ते' आमदारही देणार धक्का? सत्तेची समीकरणं बदलताच हालचाली

VIDEO : सत्तास्थापनेतील संघर्ष शिगेला, संजय राऊत यांनी भाजपबाबत केलं मोठं विधान

Published by: Suraj Yadav
First published: November 11, 2019, 10:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading