नाशिक, 29 जुलै: मुंबई, पुणेपाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. धक्कादायक दिंडोरी तालुक्यातील पालखेड येथे PPE किट बनवणाऱ्या हाय मीडिया या कंपनीचे 44 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सगळ्या बाधीत कर्मचाऱ्यांना हुबळी सेंटरमध्ये उपचार दिले जात आहे. कंपनी बंद करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याशिवाय एव्हरेस्ट कंपनीत देखील अनेकांना कोरोनाची लागण झाल्यानं आता दिंडोरीच्या औद्योगिक क्षेत्राला कोरोनाचं ग्रहण लागलं आहे.
हेही वाचा...भाजप नेत्यानं शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं, रोहित पवारांचा टोला
दिंडोरी-पालखेड मधल्या हाय मीडिया या कंपनीच्या तब्बल 44 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं ही कंपनी अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनानं घेतला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना सरकारी सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना देखील क्वारंटाइन करण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे लॉकडाऊन सुरू असताना PPE किट तयार करणारी ही कंपनी अहोरात्र सुरू होती. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना तसेच कोरोना वॉरियर्सला ही कंपनी किट पोहोचवण्याचं काम करत होती. या घटनेनंतर दिंडोरीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये प्रशासनानं कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी सुजित कोशिरे यांनी दिली आहे.
दरम्यान, याच औद्योगिक वसाहतीतील एव्हरेस्ट या कंपनीतील अनेकांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. यांच्यापासून होणारा फैलाव रोखण्यासाठी या सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा...नादखुळा, कोल्हापुरात अडीच महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवलं
खरं तर या 4 महिन्यांच्या कालावधीत कोरोना युद्धात या कंपनीच्या स्टाफनं अहोरात्र केलेल्या कामाचं सातत्यानं कौतुक करण्यात येत होतं. कोरोना वॉरीयर्स म्हणून त्यांचा गौरवही करण्यात आला. त्यांचं आरोग्य हे महत्त्वाचं आहे. मात्र आता कंपनीच बंद करावी लागल्यानं PPE किट्स पुरवठ्यात मोठा तुटवडा होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.