लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
नाशिक 1 एप्रिल : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं बुधवारी निधन झालं. बापट यांच्या निधनाला दोनच दिवस होत नाहीत तोच पोटनिवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पुण्याची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असल्याचं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं, त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर पुण्यात भाजप नेते जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर लागले. पुण्यात लागलेल्या या पोस्टरवरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुळीक यांच्यावर टीका केली आहे.
'जगदीश मुळीकला लाज वाटली पाहिजे, तुझा बाप गेला आहे आणि तुला खासदार व्हायची पडली आहे. लोक चपलेने मारतील,'असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
जगदीश मुळीक हे पुणे भाजपचे शहराध्यक्ष आहेत. भावी खासदार म्हणून पोस्टर लागल्यानंतर मुळीक यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. यानंतर हे बॅनर हटवण्यात आले आहेत.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेसाठी निवडणुका होण्याची शक्यता आहे. लोकसभा विसर्जित होण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिकचा कालावधी असेल तर निवडणूक घ्यावी लागते, त्यामुळे पुण्याची लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता दाट आहे. आता निवडणूक होणार म्हटलं की उमेदवार कोण ? कुठले पक्ष निवडणुक लढवणार ? असे प्रश्न आपसूकच येतील.
पुण्यामध्ये भाजप नेते जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर, जितेंद्र आव्हाड भडकले#Pune #BJP #JitendraAwhad pic.twitter.com/G7tz0ZQnaN
— News18Lokmat (@News18lokmat) April 1, 2023
या मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, पोटनिवडणुकीसाठी उमेदवार द्यायचा की नाही द्यायचा हा निर्णय महाविकास आघाडीचा आहे. आम्ही उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरं जाऊ. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवारांना याबाबत विचारले असता या निवडणुकीवर लगेच बोलणं योग्य होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.