Home /News /maharashtra /

मी गिरीश महाजनांना राजकारणात जन्माला आणलं, आपल्या बापाला विसरणाऱ्यांची संख्या कमी नाही : एकनाथ खडसे

मी गिरीश महाजनांना राजकारणात जन्माला आणलं, आपल्या बापाला विसरणाऱ्यांची संख्या कमी नाही : एकनाथ खडसे

"गिरीश महाजन यांना मी राजकारणात जन्माला घातलं, पण ते आता आपल्याला विसरले", अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली.

जळगाव, 20 फेब्रुवारी : जळगावच्या राजकारणात भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात अनेकदा कलगीतुरा रंगतो. विशेष म्हणजे यावेळी या दोन पक्षाच्या दिग्गज नेत्यांमध्ये आता टोकाचा संघर्ष बघायला मिळतोय. गिरीश महाजन यांनी तर थेट "कोण आहेत ते खडसे? मी त्यांना ओळखत नाही", असं वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य खडसे यांच्या मनाला लागलं. त्यातून त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. "गिरीश महाजन यांना मी राजकारणात जन्माला घातलं, पण ते आता आपल्याला विसरले", अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली. गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले? "कोण आहेत ते खडसे? मी त्यांना ओळखत नाही. खडसे यांना काही महत्त्व राहिले नाही. खडसे लोकप्रतिनिधी नाहीत, काही नाहीत. त्यांना घरी बसून काहीतरी बोलावं लागतं म्हणून ते बोलतात. आम्ही काही त्यांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही", अशा खोचक शब्दांमध्ये त्यांनी टीका केली. एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर गिरीश महाजन यांच्या टीकेला एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं. "आदरणीय गिरीश महाजन हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या दृष्टीकोनातून मी सर्वसामान्य आहे. ते अनेक राज्यांमध्ये प्राचाराला जाणारे मान्यवर नेते आहेत. मी त्यांना घडवलं आहे ते विसरले. मी त्यांना राजकारणात जन्माला आणलं आहे. पण हे नेहमीचं आहे. आपल्या बापाला विसरणाऱ्यांची संख्या या जगामध्ये कमी नाही. त्यामुळे आख्ख्या जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्राला माहिती आहे की, त्यांना नेमकं कुणी जन्माला आणलं, कुणी वाढवलं, कुणी मोठं केलं, कुणी त्यांना प्रत्येकवेळी तिकीट देण्यासाठी मदत केली. मी त्यांना सर्वच गोष्टींमध्ये मदत केली", असं एकनाथ खडसे म्हणाले. (उद्धव ठाकरेंच्या आदरातिथ्याने के. चंद्रशेखर राव भारावले, म्हणाले, आम्ही दोघं भाऊ) "गिरीश महाजन आता स्वत:च्या बळावर जळगावमध्ये निवडणुकीत यश मिळवून देतील, अशी स्थिती नाही. आताचा अलिकडचा कालखंड पाहिला तर बोदवड नगरपरिषदेत भाजपची सत्ता होती. भाजपचा नगराध्यक्ष आला. त्याठिकाणी शिवसेनेबरोबर चुपी युती केली. भाजप भूईसपाट झाली. भाजपचा एकमेव माणूस निवडून आला तोही चिठ्ठीवरुन निवडून आला. उलट राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक होते ते सात झाले आणि आमचा एक चिठ्ठीमुळे पडला. जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेची निवडणूक झाली त्यावेळी गिरीश महाजन यांनी पळ काढला. ते जिल्हा बँकेत एकही माणूस उभे करु शकले नाहीत. वेगवेगळ्या निवडणुकीत तिच परिस्थिती आहे", अशी टीका खडसेंनी केली. "भाजपची स्वबळावर निवडून येण्याची स्थिती आता जिल्ह्यात राहिलेली नाही. नेत्यानेच आत्मविश्वास गमविल्याने समोर कसं जायचं अशी स्थिती भाजप कार्यकर्त्यांची आहे. त्यांनी माझ्याकडे ते बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे यावर फार काही बोललेलं बरं नाही. निवडणुका समोर आहेत. त्यामध्ये कोण किती पाण्यात आहे ते समोर येईल", असं एकनाथ खडसे म्हणाले.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या