मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

‘राष्ट्रवादी’च्या कार्यक्रमात कोरोना नियम धाब्यावर, स्थानिक नेत्यांवर गुन्हे, मंत्र्यांना मात्र ‘सॉफ्ट कॉर्नर’

‘राष्ट्रवादी’च्या कार्यक्रमात कोरोना नियम धाब्यावर, स्थानिक नेत्यांवर गुन्हे, मंत्र्यांना मात्र ‘सॉफ्ट कॉर्नर’

सोलापूरमध्ये ‘हेरिटेज लॉन्स’ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला अलोट गर्दी (Crowd) जमली होती.

सोलापूरमध्ये ‘हेरिटेज लॉन्स’ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला अलोट गर्दी (Crowd) जमली होती.

सोलापूरमध्ये ‘हेरिटेज लॉन्स’ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला अलोट गर्दी (Crowd) जमली होती.

सोलापूर, 18 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (NCP) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोरोनाबाबतचे सर्व नियम (Corona guidelines and rules) आणि निकष धाब्यावर बसवण्यात आले. सोलापूरमध्ये ‘हेरिटेज लॉन्स’ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला अलोट गर्दी (Crowd) जमली होती. कोरोना काळात राजकीय कार्यक्रम न घेण्याची सक्त ताकीद मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिली असताना आणि राज्य सरकारनंही (State Government) त्यासाठी नियम कडक केले असताना ही गर्दी जमली. सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या कार्यक्रमाला उपस्थित असणारे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नावाचा मात्र  गुन्ह्यांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, शहराध्यक्ष भरत जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 11 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम 143, 188, 269, 336 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यक्रमात जर नियमांचं उल्लंघन झालं असेल, तर सरसकट सर्व उपस्थित नेत्यांवर गुन्हे दाखल न करता केवळ स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल का करण्यात आले, अशी चर्चा सध्या सुरु आहे. यापूर्वी काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे आणि मराठा आक्रोश मोर्चात सहभागी झालेले भाजपचे 5 आमदार यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. मग आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करताना पोलीस मागे का हटत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या कारवाईवर स्थानिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या गृहखात्याचा गैरवापर पक्षाकडून होत आहे का असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

हे वाचा -अनिल देशमुखांच्या मूळगावी EDचे छापे, कार्यकर्त्यांच्या नारेबाजीचा Live Video

कोर्टाच्या सूचनेनंतरही गर्दी

एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असताना आणि कुठल्याही कार्यक्रमातील उपस्थितीची मर्यादा निश्चित करण्यात आलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यक्रमात गर्दी झाली. राजकीय कार्यक्रमांना आळा घालणे तुम्हाला जमत नसेल, तर आम्हाला सांगा. आम्ही काय ते बघू, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर सरकारने गर्दी होऊ न देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या राष्ट्रवादीकडूनच नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

First published:

Tags: Coronavirus, NCP, Solapur (City/Town/Village)