मुंबई, 10 सप्टेंबर: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत बॉलिवूड माफियांशी संबंध असल्याचे वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौत हिच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांची बदनामी केल्याप्रकरणी विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा...‘शिवसेना आता संपली आहे’, कंगना प्रकरणावरून भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कंगनाचा पाली हिल येथील बंगल्याचं बांधकाम तोडण्याशी कुठलाही थेट संबंध नसताना ट्विटरवर व्हिडिओ अपलोड करून मुख्यमंत्र्यांवर आरोप करून त्यांची बदनामी केल्याचा तक्रारदार अँडव्होकेट नितीन माने यांनी आरोप केला आहे. याप्रकरणी विक्रोळी कोर्टातही अब्रूनुकसानीचा खटला कंगनाविरोधात चालवला जाणार असल्याच नितीन माने यांनी म्हटलं आहे.
कंगना रानौत ही मुंबईत पोहोचली आहे. मात्र, तिनं आपल्या घरी पोहोचताच एक व्हिडिओ ट्विट केला होता. यात तिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. व्हिडिओ शेअर करत मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. 'तुमने जो किया अच्छा किया. उद्धव ठाकरे आज माझं घर तोडले आहे, उद्या तुमचे गर्वहरण होईल, असे कंगनानं म्हटलं आहे. यावेळी कंगनाने पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे.
हेही वाचा...मेले तरी बेहत्तर; तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही - कंगनाचं उद्धव ठाकरेंना उत्तर
''उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटते. फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडून तुम्ही बदला घेतला आहे. आज माझं घर तुटले आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. हे वेळेचं चक्र आहे, नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत. काश्मिरी पंडितांना कसं वाटते, हे मला आज समजले. आज मी या देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्या नाही तर काश्मीरवरही चित्रपट तयार करणार. आपल्या देशवासियांना जागरुक करणार. ही क्रूरता आणि दहशतवाद माझ्यासोबत झाला हे चांगलं आहे, कारण याचा काही अर्थ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.'' असंही कंगनानं व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे.