मंगळवेढा, 16 नोव्हेंबर : कोरोनाच्या काळात बंद असलेली मंदिरं (temples open) अखेर 8 महिन्यानंतर उघडण्यात आली आहे. राज्यातील सर्वच देवस्थानांनी नियम अटींचे पालन करत मंदिरांची दार उघडली आहे. परंतु, मंगळवेढ्यात (mangalvedha) जमावबंदीचा आदेश तोडल्यामुळे यात्रेत पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रेदरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने जमाबंदीचा आदेश लागू केला होता. असं असतानाच त्याच पूर्व संध्येला तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रा काढण्यात आली होती.
शेकडो लोकांच्या संख्येनं गावकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. पालखी सोहळा सुरू असताना पोलिसांनी गावकऱ्यांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. पण, गर्दी वाढतच चालली होती. त्यामुळे अखेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पालख्यासोबतचे भाविक, यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह 74 जणांवर गुन्हे दाखल केले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली.
या प्रकरणाची फिर्याद गुप्तवार्ता विभागाचे राजकुमार ढोबळे यांनी दिली. कोरोनाचा साखळी वाढू नये म्हणून शासनाने जमावबंदीचा आदेश दिल्यामुळे तालुक्यांमध्ये गैबीपीर उरूस, गणेशोत्सव, नवरात्र, लक्ष्मी दहिवडी येथील यात्रा, हुन्नूर येथील भेट सोहळा असे तालुक्यात होणारे मोठे कार्यक्रम रद्द झाले होते.
दीपावली पाडव्याच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रेदरम्यान या परिसरात शिलवंती(उमरगा), बिरोबा(शिरढोण), विठोबा(सोन्याळ,जत), जकाराया(येणकी), बिराप्पा(जिरअंकलगी), बिरोबा(हुन्नूर), मड्डी जकराया, महालिंगराया(हुलजंती),या गावातील ग्रामदैवताच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा गावाजवळील ओढ्यात दरवर्षी आयोजित केला जातो. याही वर्षी या सोहळ्या दरम्यान सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नाही. तोंडाला मास्क लावला नाही व जमावबंदी आदेशाचा भंग केल्याबद्दलचा ठपका ठेवून देवस्थान कमिटी आणि भेटीसाठी आलेल्या पालखीसोबत च्या भाविकांसह एकूण 74 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.