अकोला, 01 नोव्हेंबर : पैसा कमवण्यासाठी कोण कधी कशी शक्कल लढवेल याचा नेम नाही. अकोल्यात (akola) चक्क गांजाची (Hemp farming) शेती करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. घराजवळ अवैधरित्या गांजा झाडांची लागवड करून विक्री करण्यात येत होती. पोलिसांनी छापा टाकून आरोपींना अटक केली आहे. तर बीडमध्येही (beed) सामूहिकपणे गांजाची शेती केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवा मेळ इथं हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गांजाची झाडे जप्त करून आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई अकोला पोलिसांच्या विशेष पथकाने केली आहे. विशेष पथक मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात गस्तीवर असताना, पेट्रोलिंग करीत असताना सांगवा मेळ येथे अवैधरित्या गांजा झाडाची शेती करून विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला प्राप्त झाली.
पुढील 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; पुण्यासह या जिल्ह्यांना इशारा
त्यानंतर पथकाने छापा टाकत या ठिकाणी 58 वर्षीय दिलीप बंकट सोळंके यांच्या घराजवळच्या शेतात अवैधरित्या गांज्याची लागवड केल्याचे दिसून आले. तसंच या ठिकाणी विक्रीही होत असल्याचे समोर आले. पोलिसांच्या विशेष पथकाने झाडांसह 13 हजार 700 रुपये जप्त केले. पोलिसांनी आरोपींकडून गांज्याची एकूण 5 झाडे जप्त केली. सर्व झाडांचे एकूण वजन 1 किलो 370 ग्रॅम आहे.
याप्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली .
परळी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची सामूहिक शेती
तर दुसरीकडे, बीडच्या परळी तालुक्यातील गुट्टेवाडी व हाळंब या गावात गांजाची लागवड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुट्टेवाडी गावांमध्ये एका शेतकऱ्याने, आपल्या तुरीच्या शेतामध्ये गांज्याची लागवड केली होती. तर हाळंब गावात अनेक शेतात गांजाची लागवड केलेली आढळून आली आहे. परळी तालुक्यातील परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे व त्यांची टीमने कारवाई केली असून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. तसंच 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चक्क पालकमंत्र्यांच्या तालुक्यात गांजाची शेती आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
भारताच्या पराभवानंतर वसीम-वकारने मर्यादा ओलांडली, संतापजनक VIDEO
परळी तालुक्यातील हाळंब परिसरात शेतात गांजाची लागवड केली असल्याची माहिती परळी ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांना मिळाली. त्यांनी सरकारी पंचासह हाळंब येथे पाहणी केली. यावेळी या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केलेली आढळून आली. मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्याची कारवाई सुरू असून घटनास्थळी वरीष्ठही दाखल झाल्याची माहिती आहे.
तर दुसऱ्या घटनेत परळी तालुक्यातील गुट्टे वाडी शिवारात गांजा लागवड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांना मिळाल्यानंतर, त्यांनी या गांज्याच्या शेतीवर छापा टाकलाय. या कारवाईत तब्बल एक क्विंटल गांजा तूरीच्या शेतामधून जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात, फरार आरोपी भाऊसाहेब दत्ता गुट्टे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.