बब्बू शेख, (प्रतिनिधी)
मनमाड, 30 जून- नांदगाव तालुक्यातील साकोरा इथे अज्ञात माथेफिरूने शेतकऱ्याच्या विहिरीत विष टाकल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नांदगावच्या साकोर येथे एका माथेफिरूने शेतकऱ्याच्या विहिरीत विष टाकल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा याच गावातील दुसऱ्या शेतकऱ्याच्या विहिरीत विष टाकून पाणी दुषित करण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विहिरीमध्ये विष टाकणारा हा माथेफिरू कोण आहे, तो असे का करतोय असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. हा प्रकार दोन्ही वेळी विहिर मालकांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी विहिरीच्या पाण्यात विष टाकणाऱ्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वीही विहिरीच्या पाण्यात टाकले होते विष
एका माथेफिरुने विहिरीच्या पाण्यात विष टाकल्याची धक्कादायक घटना नांदगावच्या साकोरा इथे काही दिवसांपूर्वी घडली होती. ही बाब विहिर मालकाच्या वेळीच लक्षात आल्यामुळे सुदैवाने सगळ्यांचे प्राण थोडक्यात बचावले होते. सूडाने पेटलेल्या एका माथेफिरूने संपूर्ण कुटुंबीयाला संपविण्यासाठी चक्क विहिरीतील पाण्यात विष टाकले. सुदैवाने वेळीच हा प्रकार विहिर मालकाच्या निदर्शनास आल्यामुळे कुटुंबासोबत त्याच्याकडे असलेली जनावरांचाही जीव थोडक्यात बचावला. शांताराम बोरसे हा शेतकरी आपल्या कुटुंबीयांसोबत साकोरा गावात राहतो. त्याच्याकडे गायी व बैल देखील आहेत. त्याच्या शेतात असलेल्या विहिरीला चांगले पाणी असून त्याचा वापर ते पिण्यासाठीही करतात. जनावरांना पाजण्यासाठी ते विहिरीवरून आणण्यासाठी गेले होते. पाण्यात त्यांना फेस आल्याचे दिसले. त्यामुळे त्यांना संशय आला. वेळीच हा प्रकार बोरसे यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांची जनावरांचाही जीव वाचला. या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल तपास सुरू केला आहे.
महिला वन अधिकारी आणि पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला, VIDEO व्हायरल