मुंबई, 27 जुलै : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. 'उद्धव ठाकरे यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो', अशा शब्दांत मोदी यांनी ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे, राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांना 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे' असा उल्लेख करत शुभेच्छा दिल्या आहे.
Best wishes to Maharashtra CM Shri Uddhav Thackeray Ji on his birthday. I pray for Uddhav Ji’s long and healthy life. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) July 27, 2020
तसंच, मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात पंतप्रधान म्हणतात की, वाढदिवस हा गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो, त्याबरोबरच हा दिवस म्हणजे एक संधी असते भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची. मला विश्वास आहे की आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल. आपल्याला वाढदिवसानिमित्त मी ईश्वराकडे हीच प्रार्थना करेन की त्याने आपल्याला आनंदी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य द्यावे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना महत्त्वाची सूचना
दरम्यान, राज्य कोरोना सारख्या संकटाचा मुकाबला करत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा करणार नाही, असे जाहीर केले आहे. तसंच, त्यांनी कार्यकर्त्यांना एक महत्त्वाची सूचनाही केली आहे.
कोरोनाची परिस्थिती बिकट असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना गर्दी करण्याचे आवाहन केले आहे. बॅनर, होर्डिंग न लावण्याची सूचनाही केली आहे.
तसंच, या वर्षी शिवसैनिकांनी 'मातोश्री'वर शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये, असे आदेश उद्धव ठाकरेंनीच दिले आहे. त्या ऐवजी सर्व शिवसैनिकांनी कोरोनाचा सक्षम मुकाबला करण्यासाठी रक्तदान शिबीर, प्लाझ्मादान शिबीर आयोजित करावे, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं.
तसंच कोरोनाबाधित रुग्णांसाठी जी काही मदत करता येईल ती मदत करावी, असंही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना सांगितलं आहे.
अजित पवारांकडून अनोख्या शुभेच्छा
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा देत एक फोटो ट्वीट करून सूचक इशारा दिला आहे.
सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी तिन्ही पक्ष जरी असले तरी स्टिअरिंग हे माझ्याच हातात आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांनी गाडीची स्टिअरिंग आपल्या हातात असल्याचा इशारा केला आहे.
Best wishes to the Hon. CM of Maharashtra, ShivSena Party President & Maha Vikas Aghadi Leader, Shri. Uddhav Thackeray ji. Wish you a healthy & long life! @OfficeofUT @CMOMaharashtra pic.twitter.com/PlrNgNg508
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 26, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच गाडीत बसले आहेत आणि या गाडीचं स्टिअरिंग अजित पवारांच्या हातात आहे.
या अनोख्या शुभेच्छांमुळे पुन्हा एकदा स्टिअरिंग नक्की कुणाच्या हातात आहे? अशी दबक्या आवाजात कुजबुज सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.